वरणगाव रेल्वे स्टेशनवर रेल्वे थांब्यासाठी 29 रोजी रेल रोको
भुसावळ : वरणगाव रेल्वे स्थानकावर कोरोना काळापूर्वी ज्या रेल्वे थांबत होत्या त्यांचा थांबा बंद करण्यात आल्याने या परीसरातील रेल्वे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. बंद करण्यात आलेले थांबे पूर्ववत सुरू करावेत तसेच अन्य न्याय मागण्यांसाठी वरणगावचे माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी 29 रोजी रेल रोको आंदोलनाचा डीआरएम ईती पांडे यांना दिला आहे.
डीआरएम प्रशासनाला इशारा
वरणगाव रेल्वे स्थानकावरील अनेक गाड्यांचे थांबे कोरोनानंतर रद्द करण्यात आल्याने वरणगाव व परिसरातील नागरिकांचे हाल मोठ्या प्रमाणावर होत आहेत. वरणगाव शहर 60 हजार लोकसंख्येचे शहर असून या शहराला 28 खेडे लागून आहेत शिवाय बोदवड तालुका लागून आहे तसेच आयुध निर्माणी, दीपनगर वीजनिर्मिती केंद्र लागून आहे. शाळा-महाविद्यालय, मोठी बाजार पेठ असलेले शहर असलेल्या शहरात कोरोनापूर्वी अनेक गाड्यांना थांबा होता मात्र कोरोना संपताच प्रशासनाने गाड्यांना थांबा बंद केला असून हा थांबा पूर्ववत सुरू करा या मागणीसाठी भुसावळ डीआरएम ईती पांडे यांची भेट वरणगावचे नगराध्यक्ष सुनील काळे यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने घेतली. यावेळी प्रवासी संघटनेचे अध्यक्ष नाना चौधरी डेपो व शालिग्राम डोयसे, जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद भैसे, मुस्लिम अन्सारी मोदी, योगेश माळी, सुभाष सेठ पोतदार, सुनील माळी, शहराध्यक्ष भाजपा राहुल जंजाळे, आकाश निमकर, गोलू राणे, साबीर कुरेशी, बळीराम सोनवणे, शामराव धनगर, रमेश पालवे यासह पदाधिकारी उपस्थित होते.


या मागण्यांबाबत निवेदन
वरणगावात अप-डाऊन सेवाग्राम एक्सप्रेसला तसेच सुरत-अमरावती सुपर फास्ट, अमरावती-पुणे हुतात्मा, महाराष्ट्र डाऊन, अजमेर-हैद्राबाद एक्स्प्रेसला थांबा देण्याची मागणी करण्यात आली या शिवाय सायंकाळची नागपूर पॅसेंजर सुरू करावी, मेमूच्या दिवसातून पाच वेळा फेर्या वाढवाव्यात, नागेश्वर येथे उड्डाण पूल उभारावा, सिध्देश्वर नगरात भूमिगत पूल करण्यासह रेल्वे स्थानकाचा विकास करावा व वरणगाव रेल्वे स्थानकावर माल धक्का सुरू करावा आदी मागण्या करण्यात आल्या तसेच नऊशे नागरीकांच्या स्वाक्षर्या असलेले निवेदन देण्यात आले. मागण्या मान्य न झाल्यास 29 डिसेंबर रोजी वरणगाव येथे रेल रोकोचा इशारा देण्यात आला आहे.
लोकप्रतिनिधींनाही दिले निवेदन
रेल्वे मंत्री अश्विनी कुमार वैष्णव, रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे पाटील, ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन, भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे यांना देण्यात आल्या.





