फैजपूर शहरातील जीवघेणे खड्ड्यांकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
फैजपूर : फैजपूर शहरातील यावल रोड, भुसावळ रोड, सावदा रोड या अत्यंत दाट रहदारी असलेल्या मुख्य रस्त्यांवरील महाकाय जीवघेण्या खड्ड्यांकडे सार्वजनिक बांधकाम खात्याचे गेल्या काही महिन्यांपासून दुर्लक्ष झाल्याने वाहनधारक संतप्त झाले आहेत. या रस्त्यांवर अपघातांची मालिका कायम असून सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी वा लोकप्रतिनिधी कोणत्या अप्रिय घटनेची वाट पाहत आहेत ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
महाकाय खड्ड्यांमुळे अपघाताची भीती
यावल रोडवरील पेट्रोल पंप व सुमंगल लॉन्स मंगल कार्यालयासमोर अंकलेश्वर बर्हाणपूर राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याच्या मधोमध महाकाय खड्डा तयार झाला आहे. राष्ट्रीय महामार्गावरील भुसावळ रोड चौफुली, हुतात्मा बाबू वाणी चौकात रीक्षा थांब्यावरील रस्त्याच्या मधोमध मोठे महाकाय खड्डे तयार झाले आहेत. सुभाष चौकात महाकाय खड्डा तयार झाला असून यापुढे धाडीनदी पुलावर महाकाय खड्डे तयार झाले आहेत. या सर्व जागी शहराची तसेच महामार्गाची मोठ्या प्रमाणावर रहदारी असतानाही सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने आश्चर्य व संताप व्यक्त होत आहे. महाकाय खड्ड्यांमध्ये वाहनधारक पडून छोट्या-मोठ्या अपघातांची मालिका गेल्या चार पाच महिन्यापासून सुरू आहे मात्र कुंभकर्णी झोपेत असलेले बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधींचे डोळे उघडणार कधी? असा प्रश्न आहे.







