भुसावळातील बियाणी मिलिटरी स्कूलमध्ये वार्षिक शालेय क्रीडा महोत्सवाला सुरूवात
Annual school sports festival begins at Biyani Military School, Bhusawal भुसावळ : शहरातील बियाणी मिलिटरी स्कूलमध्ये वार्षिक शालेय क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन झाले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते शालेय ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी शाळेच्या 900 विद्यार्थ्यांनी शालेय ध्वज व मान्यवरांना उत्कृष्ट पथसंचलन करीत मानवंदना दिली. दोन दिवस चालणार्या या क्रीडा महोत्सवात विविध क्रीडा प्रकारात शाळेचे सर्व विद्यार्थी व विद्यार्थीनी सहभागी होत आहेत. धावण्याच्या शर्यतीत 100 मीटर, 200, 400, 800, 1500 व 3000 मीटर तसेच रिले रेस इत्यादी तसेच उंच उडी, लांब उडी, गोळा फेक, भालाफेक, थाळीफेक आदी क्रीडा स्पर्धा होणार आहे.
यांची प्रसंगी उपस्थिती
उद्घाटनप्रसंगी बियाणी एज्युकेशन ग्रुपचे अध्यक्ष मनोज बियाणी अध्यक्षस्थानी होते. प्रमुख अतिथी म्हणून के.नारखेडे विद्यालय व जुनिअर कॉलेजचे प्राचार्य एन.बी.किनगे व बियाणी एज्युकेशन ग्रुपच्या सचिव डॉ.संगीता बियाणी होत्या. राजीव पारीख व बियाणी स्कूलचे प्राचार्य रुद्रासेन गठिया उपस्थित होते. प्रमुख अतिथी किनगे यांनी आपल्या भाषणातून खेळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, सांघिक भावना व खेळाडू वृत्तीचा विकास साधला जातो, असे सांगितले. मान्यवरांचे हस्ते 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेला हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. शाळेचे प्राचार्य डी.एम.पाटील यांनी आभार प्रदर्शन मानले.







