सुरवाडे खुर्द ग्रामपंचायतीला ग्रामस्थांनी ठोकले टाळे
Surwade Khurd Gram Panchayat was beaten by the villagers बोदवड : बोदवड तालुक्यातील सुरवाडे खुर्द येथे ग्रामसेवक गोविंद राठोड यांच्या जाचाला कंटाळून ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला टाळे ठोकले. जागेचा उतारा मिळण्याबाबत छावा संघटनेचे तालुकाध्यक्ष गजानन पाटील यांच्या सहित अन्य ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीत वारंवार मागणी केली परंतु उतारे संपलेले आहेत अशी उडवा-उडवीची उत्तरे ग्रामपंचायतीकडून मिळाली.
अखेर ठोकले टाळे
सुरवाडे खुर्द येथील ग्रामसेवक गोविंद राठोड हे महिन्यातून एकदाच ग्रामपंचायतीमध्ये येत असल्याची ओरड ग्रामस्थांकडून होत आहे. उतार्याअभावी मोदी आवास घरकुल योजनेचे ग्रामस्थांचे प्रस्ताव प्रलंबित राहत आहेत. ग्राभसभा कागदोपत्री घेणे, प्रोसेडिंग अपूर्ण असल्याने मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत असल्याची ग्रामस्थांची ओरड आहे. ग्रामपंचायतीत संगणक चालक असून सुद्धा कोणतीही कामे ऑनलाईन होत नसल्याने ग्रामपंचायतीचा नाहक निधी खर्च होत असल्याबाबत तक्रार गजानन पाटील यांनी 22 रोजी गटविकास अधिकारी यांना देत ग्रामपंचायतीला टाळे लावण्याचा इशारा दिला होता. ग्रामपंचायतीला टाळे लावल्यानंतर चावी ही गटविकास अधिकारी यांच्याकडे लेखी पत्र देत देण्यात आली. ग्रामसेवक गोविंद राठोड यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई तसेच नवीन ग्रामसेवक मिळण्याबाबतची मागणी तक्रारीद्वारे गजानन पाटील यांनी केली.


ग्रामसेवकांना बजावली नोटीस
गटविकास अधिकारी निशा जाधव म्हणाल्या की, ग्रामसेवक गोविंद राठोड यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली असून सुरवाडे खुर्द येथे नवीन ग्रामसेवक देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.





