भुसावळातील मुदत संपलेल्या 30 संकुलांतील एक हजार 265 गाळ्यांचे मोजमाप : दरवाढीनंतर पालिकेला दरमहा साडेपाच कोटींचे उत्पन्न
नवीन दरनिश्चिती अटळ : पालिकेने दाखल केले न्यायालयात कॅव्हेट,
Measurement of one thousand 265 clods of expired 30 parcels in Bhusawal : Income of 5.5 crores per month to municipality after rate hike भुसावळ : भुसावळ पालिकेच्या मुदत संपलेल्या 1 हजार 265 गाळेधारकांना नोटीस बजावल्यानंतर पालिकेने आता त्री सदस्यीय समितीकडून भाडेनिश्चितीची प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक राजेश पाटील, मुख्याधिकारी महेश वाघमोडे, आरेखक महेश चौधरी यांच्या उपस्थितीत शुक्रवारपासून पालिकेच्या संकूलांच्या गाळ्यांचे मोजमाप सुरू झाले आहे. आगामी काळात या गाळ्यांना रेडीरेकनर दराप्रमाणे नवीन दर लागू होतील. यामुळे सध्या पालिकेला मिळत असलेले 60 लाखांचे वार्षिक उत्पन्न साडेपाच कोटींवर पोचणार आहे. दरम्यान या सर्व प्रक्रियेवर न्यायालयीन वाद निर्माण होऊ नये, म्हणून पालिकेने औरंगाबाद खंडपीठात कॅव्हेट दाखल केले आहे. नगररचना विभागाकडून मोजमाप झाल्यानंतर त्री सदस्यीय समितीकडून नवीन दरनिश्चिती होऊन या गाळ्यांचा लिलाव किंवा निविदा प्रक्रियेने वितरण होणार आहे. यामुळे सध्यस्थितीत गाळेधारकांना आपल्या दुकानांचा ताबा सोडावा लागणार आहे. या संदर्भात पालिका प्रशासनाने यापूर्वीच गाळेधारकांना नोटीस दिली आहे.
बुधवारपर्यंत पूर्ण संकूलांची होणार मोजणी
पालिका व नगर शुक्रवारी जामनेररोडवरील दिनदयाळनगर संकूल, फायर फायटर जवळील संकूल, पांडूरंग टॉकीज मागील दुकाने, द. शि. विद्यालय संकूलातील दुकानांचे मोजमाप केले. आता सोमवारी मुख्य बाजारपेठेतील कपडा मार्केट, चूडी मार्केट, कासार गल्ली लेन आदींसह सर्व 11 संकूले तसेच तार ऑफिसरोड संकूलांचे मोजमाप होईल. शहरातील सर्व संकूलांची मोजणी बुधवारपर्यंत पूर्ण होणार आहे.


रेडीरेकनर दराच्या आठ टक्के होणार वाढ
पालिका प्रशासनाने गेल्या महिन्यातच शहरातील पालिकेच्या सर्व व्यापारी संकूलातील गाळ्यांचे क्षेत्रफळाची मोजणी केली होती. यानंतर गाळेधारकांना नोटीस बजावण्यात आली. आता याच प्रक्रियेत नवीन दर निश्चित करण्यासाठी नगररचना विभागाकडून सर्व संकूलातील प्रत्येक दुकानाचे क्षेत्रफळ, वर्णन आदींचा डेटा तयार केला जात आहे. क्षेत्रफळानुसार रेडीरेकनचे दर गृहीत धरुन आगामी काळात जागेच्या एकूण मुल्याच्या आठ टक्के वार्षिक भाडेपट्टा आकारणी होणार आहे.
पालिकेने दाखल कॅव्हेट
पालिकेने गाळेधारकांना नोटीस बजावल्यानंतर या संदर्भात न्यायालयीन दावे होण्याची शक्यता आहे. यामुळे पालिकेने औरंगाबाद खंडपीठात कॅव्हेट दाखल केले आहे. यामुळे न्यायालयाने गाळेधारकांचा दावा दाखल करून घेण्यापूर्वी किंवा त्याची सुनावणी करण्यापूर्वी नोटीस देण्यार्याचे अर्थात पालिकेचे म्हणणे ऐकून घ्यावे लागेल. यामुळे पालिकेने दिवाणी प्रक्रिया संहिता 1908 च्या कलम 148 (अ) नुसार कॅव्हेट दाखल केले आहे.
अशी आहेत पालिकेची 30 संकूले
बाबा तुलसीदास उदासी मार्केट, संतोष चौधरी म्युनिसीपल मार्केट, शहीद अब्दूल हमीद मार्केट, स्व. छबीलदास चौधरी संकूल, शाहिर अण्णाभाऊ साठे मार्केट, डेली मार्केट, नगरपालिका शाळा पाच जवळील म्युनिसीपल मार्केट, गोपाळ नगर मार्केट, संत रोहिदास महाराज मार्केट, संत जगनाडे महाराज मार्केेट, छत्रपती शिवाजी महाराज संकूल, द. शि. महाविद्यालयाजवळील म. गांधी मार्केट, नारायण पाटील मार्केट, टेक्निकल हायस्कूल समोरील वल्लभभाई पटेल मार्केट आदींसह अन्य 30 व्यापारी संकूले शहरात आहेत. यातील सर्वच गाळ्यांची मुदत संपून 8 ते 10 वर्षांचा काळ लोटला गेला आहे.
नवीन दरनिश्चितीनंतर लिलाव होतील
गाळ्यांची मुदत संपली असून अद्यापही पूर्वीच्या भाडेपट्ट्याने दुकाने वापरली जात आहे. आता या प्रक्रियेत नवीन दरनिश्चिती होईल. यामुळे पालिकेचे उत्पन्न वाढेल. त्रि सदस्यीय समितीने दिलेल्या दरनिश्चितीनंतर गाळ्यांचा लिलाव किंवा निविदा प्रक्रिया होतील. नगररचना विभागाने शुक्रवारपासून मोजणी सुरू केली असल्याचे मुख्याधिकारी महेश वाघमोडे म्हणाले.





