अंकलेश्वर-बर्‍हाणपूर महामार्गाचे चौपदरीकरण रावेरमार्गे व्हावे

भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांची मंत्री गडकरी यांच्याकडे मागणी


Ankleshwar-Berhanpur highway should be four-lane through Raver
रावेर :
सध्याचा अंकलेश्वर, चोपडा, यावल, सावदा, वाघोदा, वडगाव, विवरे, रावेरमार्गे बर्‍हाणपूर जाणारा रस्ता आहे मात्र चौपदरीकरणात रावेर शहराला वगळून दुसरीकडे वळविण्यात येत आहे. आहे त्याच मूळ रावेर मार्गाने महामार्ग ठेवण्यात यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. सद्य स्थितीतील रस्ता जर विविध गावांना बायपास केला तर मुख्य मार्गाशी जोडणार्‍या रस्त्यांवर उड्डाणपूल (ओव्हरब्रीज) बांधावे लागतील व त्यामुळे खर्चातही वाढ येणार आहे.

जमीन अधिग्रहणापेक्षा खर्च अधिक
आता हा मार्ग विवरे खुर्द बायपास करून बाहेरून काढण्यात आला आहे परंतु विवरे खुर्द या गावाला निंभोरा बुद्रुक ते विवरे खुर्द, खिर्डी ते विवरे खुर्द, अजंदा ते विवरे या गावावरून येणारे रस्ते हे थेट अंकलेश्वर-बर्‍हाणपूर या महामार्गाला जोडतात आणि सदरचा रस्ता जर विवरे खुर्दला बायपास केला तर या तिन्ही रस्त्यांवर उड्डाणपूल (ओव्हरब्रीज) बांधावे लागतील तसेच मध्ये येणार्‍या वाघाडी नाल्यावर सुद्धा ओव्हरबीज बांधावा लागेल. म्हणजे विवरे खुर्द गावासाठीच चार (ओव्हरब्रीज) उड्डाणपूल बांधावे लागतील आणि याचा खर्च नक्कीच जमीन अधिग्रहणापेक्षा जास्त असणार आहे. आताच्या आपल्या धोरणानुसार अधिग्रहित होणारी जमीन उपजाऊ व सुपीक केळी पिकांकरता अति उत्तम असलेली आहे. शेतकर्‍यांचा यासाठी विरोध आहे, कारण शेतकर्‍यांच्या बांधावरून न जाता मध्य भागातून महामार्ग जात असल्याने शेतकर्‍यांना त्यांची जमीन वहिवाटता येणार नाही व त्यांचे कधीही न भरून येणारे नुकसान होणार असून त्यांचा रोजगार यामुळे हिरावला जाणार आहे.


तर जमीन अधिग्रहणातही अडचणी
चोपड्यापासून संपूर्ण बर्‍हाणपूर पर्यत हा महामार्ग पाहिला तर याला अनेक गावावरून, ठिकाणाहून येणारे रस्ते जोडतात व सदरचे रस्ते या महामार्गातच विलीन होतात आणि जर आपण त्यांना बायपास करण्याचा प्रयत्न केला तर त्यावर आपल्याला उड्डाणपूल (ओव्हरब्रीज) बांधावे लागतील त्यामुळे सोबतच खर्चही लागेल त्यामुळे शेतकर्‍यांची शेतजमीन अधिग्रहण करताना खूप अडचणी निर्माण होणार आहेत. त्यापेक्षा सदरचा महामार्ग हा मूळ जसा आहे तसाच कायम ठेवून त्याचे लवकरात-लवकर काम सुरू करावे, अशी विनंतीवजा मागणी अमोल जावळे यांनी पत्राद्वारे नितीन गडकरी यांना केली आहे.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !