केळी विम्याचा लाभ मिळत नाही तोपर्यंत रावेर लोकसभा क्षेत्रातील आमदार-खासदारांना गाव बंदी
तांदलवाडी ग्रामस्थांचा निर्णय : मतदानावरही बहिष्कार टाकण्याचा ठराव संमत
MLAs-Khasdars of Raver Lok Sabha Constituency Banned from Village till they do not get Banana Insurance Benefit खिर्डी : हवामानावर आधारीत फळ पीकविमा योजनेंतर्गत जिल्ह्यातील सुमारे 81 हजार केळी उत्पादक शेतकर्यांनी फळ पीक विमा काढला होता मात्र अद्यापपर्यंत निम्म्यापेक्षा जास्त शेतकर्यांना या विम्याची रक्कम मिळालीच नसल्याने केळी उत्पादकांमध्ये विमा कंपनीविषयी तीव्र संतापाचे वातावरण आहे. अशातच जो पर्यंत शेतकर्यांना पीक विम्याची रक्कम मिळत नाही तोपर्यंत गावात खासदारांसह आमदारांना गाव बंदी तसेच मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय तांदलवाडी, ता.रावेर ग्रामस्थांनी घेतल्याने राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
लोकप्रतिनिधींविरोधात ग्रामस्थांची एकजूट
शेतकर्यांना पीक विम्याची रक्कम सप्टेंबरपर्यंत मिळणे अपेक्षित होते मात्र विमा कंपनीकडून मनमानी कारभार सुरू असल्याने रावेरसह मुक्ताईनगर परीसरातील सुमारे 10 हजार शेतकर्यांना या नुकसानीची रक्कम अद्यापही मिळालीच नसल्याने त्यांच्यात राजकीय पदाधिकारी, तक्रार निवारण समिती, प्रशासन व विमा कंपनीविषयी प्रचंड संतापाचे वातावरण आहे. पीक विम्यापासून वंचित असलेल्या तांदलवाडीसह परिसरातील शेतकर्यांनी मंगळवारी सायंकाळी तांदलवाडी राम मंदिरात बैठक घेऊन केळी पीक विमा मिळेपर्यंत तांदलवाडी गावात सर्व पक्षीय आमदार, खासदार व मंत्री यांना गावबंदी आणि मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचा ठराव संमत केला.


विमा नसल्यास प्रिमीयम परत करा
काही शेतकर्यांनी तर आम्हांला आता विमा कंपनीवर विश्वास नसल्याचे सांगून विमा कंपनी आम्हांला विमा देवू शकत नसेल तर आता 2023-24 ला जो प्रिमियम भरलेला आहे तो आम्हाला परत मिळावा, अशी भावना व्यक्त केली.
लवकरच तोडगा काढणार : आमदार चंद्रकांत पाटील
आमदार चंद्रकांत पाटील यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, शेतकर्यांना विमा मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे. मुख्यमंत्री, कृषीमंत्री आणि विमा कंपनीच्या अधिकारी यांच्यासोबत बैठक लावून त्यातून लवकरच मार्ग काढण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.





