नाथाभाऊंनी गिरीशभाऊंना दिले हे ‘चॅलेंज’ ; राजकीय डावपेचाने खळबळ
Nathabhau gave this ‘challenge’ to Girishbhau; Excitement by political maneuvering भुसावळ : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथराव खडसे व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यात विळ्या-भोपळ्याचे नेते आहे. कुठलाही प्रसंग असलातरी तरी दोन्ही नेते एकमेकांवर टिका केल्याशिवाय राहत नाही. गेल्या काही काळात तर वैयक्तिकरीत्या दोघांनी एकमेकांवर प्रचंड आरोप केल्याने जिल्हावासीयांचे चांगलेच मनोरंजन झाले होते. त्यातच अलीकडे रावेर लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असतानाच माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी मंत्री गिरीश महाजनांना निवडणूक आखाड्यात उतरण्याचे खुले निमंत्रण दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी पळ न काढता रावेर लोकसभा निवडणूक लढवावीच, असे खुले आव्हान आमदार एकनाथ खडसे यांनी दिले आहे.
आठ दिवसात चित्र होणार स्पष्ट
रावेर मतदारसंघात काँग्रेसचा 30 वर्षापासून मोठ्या फरकाने पराभव होत आला आहे, म्हणून ही जागा राष्ट्रवादीला सोडावी, असा प्रस्ताव आम्ही दिलेला आहे. येत्या आठ दिवसात जागा वाटप होतील तेव्हा सारेच स्पष्ट होईल, असे यावेळी आमदार खडसे म्हणाले. खडसे यांनी शनिवारी जळगावातील त्यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी रावेरची जागा आमची असल्याचे सांगितले, ते त्यांचे म्हणणे स्वाभाविक आहे. शेवटी आघाडी ठरवेल कोणती जागा कोणाला द्यायची ते. काँग्रेसला जागा सुटली तर डॉ.उल्हास पाटील किंवा अन्य कोणी उमेदवार असले तर त्यांना निवडून आणू.


भाजपामध्ये जाण्याचा प्रश्नच नाही
भाजपमधून बाहेर पडलेल्या नेत्यांना पक्षात घेण्यासाठी विनोद तावडे यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे, तुम्ही परत जाणार का? या प्रश्नावर खडसे म्हणाले, तावडे माझे चांगले मित्र आहेत. एकेकाळचे सहकारी आहेत. त्यांच्यासह वरिष्ठ नेत्यांना माझ्याविषयी सहानुभूती आहे. जुने लोक आले तर ताकद वाढेल असे त्यांना वाटते. मात्र भाजपने माझा जो छळ केला आहे, त्यामुळे मी कदापीही भाजपात जाणार नाही. आताच इडी आणि एसीबीचा जामीन घेतला आहे. शिवाय मी अजून पाच वर्ष आमदार आहे.
डॉ.केतकी पाटलांनी भूमिका स्पष्ट करावी
डॉ.उल्हास पाटील काँग्रेसचे माजी खासदार असून त्यांच्या कन्या डॉ.केतकी पाटील यांनीही निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. भाजप त्यांच्या संपर्कात किंवा ते भाजपच्या संपर्कात असावेत. त्या भाजपकडून लढणार असेही ऐकतो आहे. मात्र त्यांनी भूमिका स्पष्ट करणे आवश्यक असल्याचे खडसे म्हणाले.





