यावल येथील शेतकी संघ निवडणूक : 17 जागांसाठी 88 अर्ज वैध
Yaval Farmers Union Election : 88 applications valid for 17 seats यावल : यावल शेतकी संघाची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली आहे. यात सोमवार हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. अखेरच्या दिवशी बाजार समितीच्या आवारात असलेल्या सहायक निबंधक संस्था कार्यालयात अर्ज दाखल करण्याकरीता गर्दी झाली. एकूण 17 जागांसाठी मुदतीत 88 अर्ज प्राप्त झाले तर मंगळवारी छाननीत सर्व अर्ज वैध ठरले.
17 जागांसाठी 88 अर्ज दाखल
यावल येथील तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. यात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत सोमवार, 8 जानेवारी दुपारी तीन वाजेपर्यंत होती. या मुदतीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरीता बाजार समितीच्या आवारात असलेल्या सहायक निबंधक सहकारी संस्था कार्यालयात गर्दी झाली झाली. एकूण 17 जागांकरीता मुदतीत 88 उमेदवारी अर्ज प्राप्त झाले. या निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार व अजित पवार गट, भाजपा, शिवसेना शिंदे व ठाकरे गट यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. प्राप्त झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी मंगळवारी बाजार समितीच्या आवारात असलेल्या सहाय्यक निबंधक कार्यालयात सहकार अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी नंदकिशोर मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. त्यात सर्व अर्ज वैध ठरले.


असा आहे निवडणूक कार्यक्रम
शेतकी संघाच्या व्यक्तिशः मतदारसंघातील पाच, सोसायटी मतदारसंघातील सात आणि अनुसूचित जाती-जमाती, ओबीसी, विमुक्त जाती भटक्या जमाती प्रत्येकी एक आणि महिला दोन अशा राखीव पाच जागांसह एकूण 17 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. मंगळवारी छाननी झाल्यानंतर वैध अर्जांची यादी प्रसिद्ध केली जाईल तर माघारीसाठी 24 जानेवारीपर्यंत मुदत आहे व 4 फेब्रुवारी रोजी या निवडणुकीसाठी मतदान होईल. शेतकी संघात एकूण व्यक्तिशः मतदार संघात दोन हजार 825 मतदार आहेत तर सोसायटी मतदारसंघात 48 मतदार आहेत.





