राज्यातील सत्तासंघर्ष : शिंदे व ठाकरे गटाचे काही आमदार अपात्र होणार ?
मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षाच्या निकालाला अवघा एक तास शिल्लक असताना निकाल नेमका काय लागणार? हा सर्वांच्या तोंडी एकच प्रश्न आहे तर निकालाबाबत विविध शक्यताही वर्तवल्या जात आहे. त्यात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकालाच्या दोन दिवस आधी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर ठाकरे गटाकडून अनेक आरोपही करण्यात आल्यानंतर नार्वेकर नेमका काय निकाल देणार याबाबतही उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आमदार अपात्रतेबाबत दोन्ही गटांकडून एकूण 34 याचिका दाखल करण्यात आल्या असून विधानसभा अध्यक्षांनी या याचिकांची सहा टप्प्यांमध्ये विभागणी केली आहे. याबाबत दोन्ही गटांची बाजू ऐकून घेतल्यानंतर आजच्या निकालात विधानसभा अध्यक्ष यातील काही याचिका स्वीकारतील आणि काही याचिका फेटाळून लावण्याची शक्यता आहे. असं झाल्यास दोन्ही गटाचे काही आमदार अपात्र होवू शकतील.
ठरावीक आमदारांवर होणार कारवाई ?
राज्य विधिमंडळाचे माजी प्रधान सचिव अनंत कळसे यांनी सांगितलं आहे की, विधानसभा अध्यक्ष शिवसेनेच्या दोन्ही गटांतील केवळ काही आमदारांनाच अपात्र करण्याचा निर्णय घेऊ शकतात. अपात्रतेच्या एकूण 34 याचिका आहेत. त्यामुळे अपात्रतेबद्दल निर्णय घेताना अध्यक्षांनी अनेक नियमांची चाळण लावलेली असणार. काही प्रकरणांमध्ये आमदारांना अपात्र ठरण्याची स्थिती असेल, मात्र विरोधी गटाने याबाबतचे पाऊल उचलताना नेमकी प्रक्रिया पार पाडलेली नसावी. तर काही प्रकरणांमध्ये प्रक्रिया योग्य पद्धतीने पार पडलेली असेल, मात्र पक्षात अशा निर्णयाची ऑथोरिटी असणारी व्यक्ती तिथं नसावी त्यामुळे काही याचिकांच्या आधारे दोन्ही पक्षांतील मोजक्या आमदारांना अपात्र केलं जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.


तर कुणीही होणार नाही अपात्र ?
नार्वेकर जो निकाल जाहीर करतील त्यात कुणालाही पात्र केलं जाणार नाही, असंही होऊ शकतं, माजी प्रधान सचिव अनंत कळसेकळसे यांनी स्पष्ट केलं आहे. याबाबतचे वृत्त’टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलं आहे.
दरम्यान, ज्येष्ठ वकिल उज्ज्वल निकम यांनीही अशीच शक्यता वर्तवत काही याचिका स्वीकारल्या जातील आणि काही याचिका फेटाळल्या जाऊ शकतात, असं म्हटलं आहे.
500 पानांच्या निकालपत्रातून महत्त्वाचे मुद्दे घेऊन एक सारांश निकाल ते वाचून दाखवतील. हा साधारण 5-10 पानांचा सारांश निकाल असेल. त्यानंतर निकालाची मूळ प्रत दोन्ही गटाच्या वकिलांना दिली जाईल.







