जि.प.चे माजी सदस्य रमेश पाटील यांच्यासह समर्थक राष्ट्रवादीत

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश : समीकरणे बदलणार !


Former member of G.P. Ramesh Patil along with his supporters in NCP रावेर : जिल्हा परीषदेचे माजी सदस्य रमेश पाटील यांनी आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश केल्याने रावेर तालुक्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुंबईतील ‘देवगिरी’ या निवासस्थानी बुधवारी सायंकाळी उशिरा हा प्रवेश सोहळा झाला. राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतर शरद पवार व अजित पवार असे या पक्षात दोन गट निर्माण झाले. आतापर्यंत शरद पवार यांच्या गटात तालुक्यातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते कार्यरत होते परंतु तालुक्यातील राष्ट्रवादी गटात आता फूट पडली.

दिडशे कार्यकर्ते अजित पवार गटात
जिल्हा परीदेचे माजी सदस्य रमेश पाटील आणि त्यांच्यासह सुमारे दिडशे कार्यकर्ते बुधवारी राष्ट्रवादीचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटात दाखल झाले. ‘देवगिरी’ निवासस्थानी प्रवेशाचा कार्यक्रम झाला. रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सचिन पाटील, संचालक गणेश महाजन, जयेश कुयटे, पांडुरंग पाटील, माजी शहराध्यक्ष प्रणित महाजन यांच्यासह त्यांच्या सुमारे दिडशे कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.


अजित पवार गटाची ताकद वाढली
लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीत तालुक्यात फूट पडली असून आतापर्यंत तालुक्यात अजित पवार गटाचे अस्तित्व नव्हते मात्र पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रवेश केल्याने आगामी काळात होणार्‍या निवडणुकीत अनेक समीकरणे बदलतील, असे जाणकारांना वाटते. जि.प.चे माजी सदस्य रमेश पाटील यांच्या प्रवेशाने अजित पवार गटाची ताकद तालुक्यात वाढली आहे.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !