भुसावळ शहरातील 20 हजार नळ जोडण्या होणार अधिकृत
भुसावळ पालिकेची आजपासून ‘ऑन दि स्पॉट लिगल नळ कनेक्शन’ मोहिम : यावल रोडवरील अतिक्रमणही हटणार
20 thousand tap connections in Bhusawal city will be authorized भुसावळ : भुसावळ शहरातील विविध भागात तब्बल 20 हजारांहून अधिक नळ जोडण्या असून या नळ जोडणीमुळे पालिकेला कुठलाही आर्थिक फायदा होत नाही मात्र मोठ्या प्रमाणावर पाण्याचा वापर गेला जात असल्याने पालिकेचे दरवर्षी मोठे नुकसान होते. हा प्रकार थांबवण्यासाठी प्रशासक जितेंद्र पाटील यांनी शुक्रवार, 12 जानेवारीपासून अनधिकृत नळ जोडण्या ऑन दि स्पॉट लिगल करण्याबाबत मोहिम आखली आहे. यासाठी स्वतंत्र पथकाची निर्मिती करण्यात आली असून नागरीकांच्या प्रत्यक्ष घरी जावून हे पथक फॉर्म भरून घेणार आहे. नळ जोडण्या अधिकृत झाल्यानंतर पाणीपट्टीच्या माध्यमातून पालिकेच्या गंगाजळीत मोठी वाढ होणार आहे.
अनधिकृत नळ कनेक्शन होणार लिगल
नाशिक विभागात एकमेव ‘अ’ वर्ग पालिका भुसावळची आहे मात्र नागरीकांना तोकड्या सोयी-सुविधा मिळत असल्याने करांच्या स्वरूपात मिळणारे उत्पन्न अल्प आहे शिवाय नागरिक घरपट्टी व पाणीपट्टी करांचा भरणा करण्याबाबत उदासीन असल्याने वर्षानुवर्षे थकबाकीचा आकडा फुगत चालला आहे. गेल्या दोन वर्षांपासून पालिकेवर प्रशासकराज असल्याने नूतन प्रशासक जितेंद्र पाटील यांनी पालिकेची गाडी रूळावर आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न चालवले आहे. याच अनुषंगाने शहरातील अनधिकृत नळ कनेक्शन खंडित करण्याऐवजी त्यांना लिगल करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. या संदर्भात गुरुवार, 11 पालिकेत त्यांनी सर्व विभागप्रमुखांची बैठक घेत सूचना दिल्या.


अनधिकृत नळ कनेक्शनची डोकेदुखी
शहरात सर्वात मोठी डोकेदुखी अनधिकृत नळ कनेक्शनची आहे. राजाश्रयाचा लाभ घेत काहींनी थेट पालिकेच्या मुख्य जलवाहिनीला फोडत 24 तास पाणीपुरवठ्याचा लाभ घेतल्याच्या तक्रारी मागील काळात झाल्या तसेच अनधिकृत नळ कनेक्शनचा मुद्दाही समोर आला मात्र अनेक वर्षानंतरही अनधिकृत नळ कनेक्शन कट करण्याचे धाडस पालिका प्रशासनाने दाखवले नाही. शहरातील विविध भागाचा विस्तार पाहता अनधिकृत नळ कनेक्शन शोधणे व नियमित करण्याचे आव्हान पालिकेपुढे असणार आहे. पालिकेच्या माहितीनुसार, 20 हजारांपर्यंत अनधिकृत नळ जोडण्या आहेत मात्र प्रत्यक्षात हा आकडा त्याहून अधिक असल्याचे जाणकार सांगतात. या नळ जोडण्या अधिकृत झाल्यास पालिकेला नळपट्टीच्या माध्यमातून महसूल मिळणार आहे.
आढावा बैठकीत प्रशासकांकडून आढावा
गुरुवारी पालिकेत प्रशासक जितेंद्र पाटील यांनी सर्व विभागप्रमुखांची आढावा बैठक घेतली त्यात वसुलीचा प्रामुख्याने आढावा घेण्यात आला. त्यात गाळे नूतनीकरण, आस्थापना, चालू असलेली आणि प्रस्तावित कामे, पाणीपुरवठा, धोकादायक इमारती पाडणे, मंडीमधील बाजाराचे बाजार समितीमध्ये स्थानांतरण, स्वच्छता इत्यादी बाबींचा आढावा घेण्यात आला. शुक्रवारपासून अनधिकृत नळ कनेक्शन अधिकृत करण्याबाबत पथकाची निर्मिती करण्यात आली व तशी मोहिम उघडण्याचे आदेशही प्रशासकांनी यावेळी दिले.
यांची बैठकीला उपस्थिती
या बैठकीला प्रशासक जितेंद्र पाटील, उपमुख्याधिकारी परवेज शेख, पाणीपुरवठा अभियंता दीपक चौधरी, लेखापाल सुदर्शन समदाणी, अनिल आहुजा, विजय राठोड, रोहप राठोड, वैभव पवार, शशिकांत ठोंबरे यांच्यासह विविध विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते.
यावल रोडवरील अतिक्रमण पुन्हा निघणार
शहरात सर्वाधिक डोकेदुखी अतिक्रमणाची आहे. अलीकडे प्रशासकांनी यावल रोडवर अतिक्रमण हटाव मोहिम राबवली होती मात्र नंतर पुन्हा मोहिमेला ब्रेक लागल्याने पुन्हा ‘जैसे थे’ चित्र झाले मात्र आता शुक्रवार, 12 रोजी पुन्हा यावल रोडवरील तापी नदी पूल ते महात्मा गांधी पुतळा चौक परीसर व न्यायालयाच्या बाजूचा व पाठीमागील भागातील अतिक्रमण हटवण्यात येणार असल्याचे प्रशासक जितेंद्र पाटील यांनी कळवले आहे. दरम्यान, पालिकेने गुरुवारी रात्री व्यावसायीकांनी अतिक्रमण हटवण्याबाबत माईकद्वारे सूचनाही दिल्या आहेत.

आंबेडकर मार्केटमधील गाळ्यांना सील
प्रशासकांच्या आढावा बैठकीनंतर गुरुवारी दुपारी पालिका पथकाने शहरातील सर्वे क्रमांक 161 मधील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मार्केटमधील गाळ्यांचा अनधिकृतरीत्या वापर करणार्या व्यावसायीकांचे साहित्य बाहेर काढले. या मार्केटमध्ये तब्बल 116 गाळे असून त्यांचा अनधिकृतरीत्या वापर सुरू होता तर अनेकांनी या गाळ्यांचा गोदाम म्हणूनही वापर सुरू केला होता. गुरुवारी पथकाने गाळ्यांमधील साहित्य बाहेर काढत गाळ्यांना सील लावले.





