भुसावळ पालिकेच्या तापी पात्रातील बंधार्‍याची अखेर डागडूजी

उत्तरेकडील 100 मिटरचे बांधकामाला झाली सुरवात : 40 दिवस राहणार साठा


The dam in Tapi Patra of Bhusawal Municipality will be repaired at last भुसावळ  : भुसावळ शहराला पाणीपुरवठा करणार्‍या तापी नदीपात्रातील बंधार्‍याला गळती लागल्याने दररोज हजारो लिटर पाण्याची नासाडी वाढली होती. पालिकेने आता उत्तर भागातील फुटलेल्या बंधार्‍याची डागडूजी सुरू केली आहे. यामुळे आगामी काळात पाण्याची गळती थांबून साठा 40 दिवस टिकून राहण्यास मदत होणार आहे मात्र ही डागडूजी केवळ तात्पुरत्या स्वरुपाची आहे. या बंधार्‍याचे रीजॅकेटींग करण्याकडे मात्र पालिकेने दुर्लक्ष केले आहे.

दहा वर्षात लाखोंच्या निधीचा चुराडा
पालिकेने गेल्या दहा वर्षांत तब्बल पाचवेळा बंधार्‍याची उंची सव्वा ते दीड फुटांनी वाढवली मात्र उंची वाढविल्यानंतर हा दिलासा केवळ उन्हाळ्यापर्यंत टिकून राहिला. पावसाळ्यात तापीला पूर आल्यानंतर पालिकेने केलेले वाढीव बांधकाम वाहून जाते. सध्याही उत्तर व दक्षिण भागातील बराच भाग वाहून गेला. सध्या बंधारा ओव्हरफ्लो असल्याने ही स्थिती स्पष्टपणे लक्षात येत नाही. मात्र यामुळे गळती वाढून पाण्याचा अपव्यय होत आहे. सध्या बंधार्‍याचा जलसाठा कमी झाल्याने प्रामुख्याने उत्तर भागातील जवळपास 100 मिटर अंतराचा वाहून गेलेला भाग नवीन बांधकाम करून पाणीसाठा वाढविण्यासाठी प्रयत्न पालिकेने सुरू केले आहे. हे काम पालिकेने सुरू केल्यामुळे आगामी काळात बंधार्‍यात 40 दिवसांचा जलसाठा होईल. आगामी उन्हाळ्यात तो टिकणार असल्याने हतनूर धरणातून वारंवार आवर्तन घेण्याची गरज भासणार नाही.



रीजॅकेटींग करणे आवश्यक
उत्तर भागात गळतीमुळे 40 दिवस पाणी टिकणार आहे. मात्र आगामी काळात नदीला पूर आला हा वाढीव बांधकाम केलेला भाग वाहून जातो. आगामी काळातही सध्या बांधकाम होत असलेला भाग वाहून जाईल. यामुळे या बंधार्‍याचे काम चांगल्या पध्दतीने करण्यासाठी सध्याच्या बंधार्‍याला रीजॅकेटींग करून किमान दीड ते दोन मिटरने उंची वाढविणे आवश्यक आहे.

बंधार्‍याचा गाळ कधीच काढला नाही
फिल्टर हाऊसच्या बाजूने अर्थात दक्षिणेकडील भागातील पूर्व- पश्चिम असलेली बंधार्‍याची भिंत तुटली होती. तर उत्तरेकडील उथळ भागातूनही अधिक प्रमाणात पाणी वाहून जाते. या बंधार्‍याचा गाळ काढून स्वच्छता केली. किंवा पून्हा भिंतींची उंची वाढवली तर शहराला किमान दोन महिने पुरेल इतका जलसाठा सुरक्षीत ठेवता येणार आहे मात्र पालिकेने अद्यापही गाळ काढण्याचे नियोजन केले नाही. उंची वाढविण्यासोबत गाळही काढला तर स्थापीत क्षमता वाढेल.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !