मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांच्या पुन्हा वाढल्या अडचणी : 25 जानेवारीला ईडीपुढे हजर राहण्याची नोटीस
Ex-Mumbai mayor Kishori Pednekar’s problems again: Notice to appear before ED on January 25 मुंबई : मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे. गुरुवार, 25 जानेवारी रोजी ईडीकडे चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले आहे तर यापूर्वी 23 नोव्हेंबर रोजी किशोरी पेडणेकर यांची ईडीच्या अधिकार्यांनी सहा तास चौकशी केली होती. दरम्यान. कोविड काळामध्ये मुंबई महानगरपालिकेने खरेदी केलेल्या बॉडी बॅग्जमध्ये झालेल्या कथित घोटाळा प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) ने समन्स बजावल्याचे सांगण्यात आले.
बॉडी बॅग्स तिप्पट दराने खरेदी केल्याचा आरोप
कोविड काळामध्ये खरेदी झालेल्या बॉडी बॅग्स या एका खाजगी कंपनीकडून मुंबई महानगरपालिकेने तिप्पट दराने खरेदी केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी 4 ऑगस्ट रोजी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हादेखील दाखल आहे. याच गुन्ह्याच्या आधारे ईडी या प्रकरणाचा तपास करत आहे. संबंधित खाजगी कंपनीने मृतदेहासाठी तयार करण्यात आलेली बॉडी बॅग मुंबई महानगरपालिकेने 6719 रुपये दराने (प्रति बॅग दर) खरेदी केली होती. तर हीच बॉडी बॅग त्याच कंपनीकडून राज्य सरकारच्या अन्य रुग्णालयात तसेच खाजगी रुग्णालयात 1500 रुपये प्रति बॅग दराने खरेदी करण्यात आली. या प्रकरणात एकूण 49 लाख रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे.







