दीपोत्सवाने मंदिरे उजळली : श्रीरामांचा जय-जयकार !

500 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर श्रीरामलल्ला मंदिरात विराजमान : भुसावळ विभागात दिवाळी ; मंदिरांमध्ये भाविकांची मांदियाळी


Deepotsava lit up the temples: Shree Ram’s cheers! भुसावळ : पाचशे वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अयोध्येतील मंदिरात रामलल्ला सोमवार, 2 जानेवारी रोजी मुहूर्तावर विराजमान झाले. हा सोहळा भाविकांनी दिवाळीपेक्षा मोठ्या उत्साहात साजरा केला. भुसावळ शहर व विभागात नागरीकांनी ठिकठिकाणी शोभायात्रा काढत रामनामाचा जय-जयकार केला तर प्रभू श्रीराम मंदिरांमध्ये भाविकांची मांदियाळी दिसून आली. सायंकाळी दीपोत्सवाने मंदिरे उजळली होती तर ठिकठिकाणी नागरीकांनी घराबाहेर सडा-रांगोळी काढून अंगण सुशोभीत केले होते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते झालेल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर सर्वत्र जोरदार आतषबाजी करण्यात आली तर भाविकांना बुंदीचे लाडू, केळी व पेढ्यांचा प्रसाद वाटप करण्यात आला.

सावदा येथे भव्य राम फेरी व धार्मिक कार्यक्रम
सावदा : अयोध्येतील राम मंदिरात रामलला मूर्ती प्रतिष्ठास्थापनेनिमित्त सोमवारी सकाळी येथील सुंदर राम मंदिरापासून पालखीत भगवान श्रीराम यांची मूर्तीं विराजित करून सकाळी सात वाजेदरम्यान भव्य अशी रामफेरी शहरातून काढण्यात आली. यावेळी लहान-थोर, स्त्री, पुरुष सर्व स्तरातील नागरिक यावेळी उपस्थित होते. सुमारे पाच हजारांवर नागरीक यात सामील झाले. श्रीराम जय राम-जय जय रामच्या गजरात राम फेरी शहरातून निघाली. यावेळी संपूर्ण शहरात प्रत्येक ठिकाणी भव्य रांगोळ्या काढण्यात आल्या. ठिकठिकाणी सजावट करण्यात येऊन श्रीराम यांचे प्रतिमा पूजन यावेळी करण्यात आले. दुपारी 11 वाजे दरम्यान सुंदर राम मंदिरात सावदा येथील कारसेवकांचा सत्कार देखील करण्यात आला. यानंतर राम रक्षा पाठ करण्यात आला. अयोध्या येथे मूर्ती प्रतिष्ठास्थापना होईपर्यंत हे पाठ झाले या नंतर आरती होऊन प्रसाद वाटप करण्यात आला. सायंकाळी याच मंदिरात भव्य दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शहरातून प्रत्येकाने घरून एक दिवा आणून मंदिरात लावला यामुळे मंदिर उजळून निघाले होते. दिवसभर शहरात विविध ठिकाणी प्रसाद वाटप करण्यात आला. सायंकाळी अनेक ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. दिवसा तसेच रात्री शहरवासीय नागरिकांनी फटाके फोडून प्रती दिवाळी साजरी केली. दिवसभर येथे रामलला प्रतिष्ठास्थापनेचा उत्साह पहावयास मिळाला.



सावद्यात कार सेवकांचा सत्कार
सावदा येथे कार्यक्रमादरम्यान कारसेवकांचा सत्कार सावदा येथील सुंदर श्रीराम मंदिरात करण्यात आला. अयोध्या 1992 या मध्ये कारसेवक म्हणून गेलेल्या कारसेवकांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये डॉ.अतुल सरोदे, चंद्रकांत भोलाणे, मिलिंद कोरे, गजानन भार्गव, मिलिंद पाटील, धनंजय चौधरी, वना मिस्त्री, किरण महेश्री, बाळू चौधरी, युवराज महाजन, संजय चौधरी, यांचा सत्कार करण्यात आला.

जय गणेश फाऊंडेशन, भुसावळ
भुसावळ : शहरातील जय गणेश फाऊंडेशन आणि ज्येष्ठ नागरीक संघातर्फे सुरभी नगर परीसरात अयोध्येतील भगवान श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त हभप दीपक महाराज व त्यांच्या सहकार्‍यांच्या टाळ मृदंगाच्या गजरात श्रीराम, सीतामाई, लक्ष्मण आणि हनुमान मूर्तींची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी राम नामाच्या गजरात लेझीम, फुगड्या खेळत जय गणेश फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष उमेश नेमाडे, समन्वयक गणेश फेगडे, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष राजेंद्र बावस्कर, सचिव तिडके, फाऊंडेशन व ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी तसेच परिसरातील बहुसंख्य नागरिक महिला व पुरुष उपस्थित होते. यावेळी साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात आले.

रावेरात मंदिरांवर रोशनाई : भाविकांची मांदियाळी
रावेर : समाजकंटकांनी शोभायात्रेत विघ्न आणल्याचा प्रकार घडल्यानंतर पोलिस दलाने तत्काळ उपद्रवींवर कारवाई केली. सोमवारी सकाळी नागरीकांनी अत्यंत उत्साहात प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त मंदिरांमध्ये गर्दी केली तर विविध कार्यक्रमही घेण्यात आले. रावेर शहरात ठिक-ठिकाणी रांगोळ्या काढण्यात आल्या. अनेक मंदिरांवर विद्युत रोषनाई करण्यात आली. शहरात नागरीकांना लाडूचा प्रसाद वाटप करण्यात आला. काही ठिकाणी फटाके फोडून जल्लोष करण्यात आला. अनेक ठिकाणी श्रीराम यांच्या जीवनावरील भजन वाजवण्यात आले तर काही मंदिरांमध्ये भंडार्‍याचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. नागरीकांनी घरा-घरात दिवेही लावले.

भुसावळात साबुदाणा खिचडीचे वाटप
भुसावळ : भुसावळत्ततील जेसीआय ग्रुप महिला मंडळ व समाजबांधवातर्फे अष्टभूजा माता मंदिरापासून अक्षदा कलश यात्रा काढण्यात आली. श्री राम मंदिर, लक्ष्मी चौकात यात्रेचा समारोप झाल्यानंतर भाविकांना साबुदाणा खिचडभ व राजगिरी लाडूचे वाटप समाजसेवक शिवभोजन केंद्र संचालक उमाकांत शर्मा (नमा) यांच्या माध्यमातून करण्यात आले. यावेळी कैलाश अग्रवाल, रामवल्लभ (बल्लू सेठ), विनोद शर्मा, अनूप अग्रवाल, जग्गू अग्रवाल, रुपेश अग्रवाल, संतोष अग्रवाल, गोटू भराडिया, जैन भैया आदी उपस्थित होते.

मुक्ताईनगर राष्ट्रवादीतर्फे कार्यक्रम

मुक्ताईनगर : मुक्ताईनगर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्सवाचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयाच्या ठिकाणी सोमवारी सकाळी 11 वाजता सत्यनारायणाची महापूजा कारसेवक राजू पांडुरंग कपले यांच्याहस्ते सपत्नीक करण्यात आली. त्यानंतर संपूर्ण शहरातील मंदिरात तसेच कार्यालयासमोर मोतीचूर लाडूचे वाटप करण्यात आले. शहरातील कारसेवकांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.रवींद्रभैय्या पाटील, तालुकाध्यक्ष यु.डी.पाटील, आमदार एकनाथराव खडसे यांचे स्वीय सहाय्यक योगेश कोलते, माजी सरपंच प्रवीण पाटील, शहराध्यक्ष राजू माळी, बाळा भालशंकर, निलेश पाटील, बबलू सापधरे, संजू कोळी, अजय तळेले, अ‍ॅड.राहुल पाटील, बापू ससाणे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार एकनाथराव खडसे यांच्या वतीने संपूर्ण मतदार संघात श्रीरामांचे मोठ-मोठे कटआउट व मी कारसेवक असल्याचा अभिमान असल्याचे होर्डीग्ज संपूर्ण मतदार संघात लावण्यात आले.

भुसावळात 24 ठिकाणी दीपोत्सव
भुसावळ : प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा उत्सवाच्या निमित्ताने शहरातील 34 मंदिरांमध्ये आरती तर 26 ठिकाणी दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले. सोमवारी दुपारी 12 वाजून 29 मिनिट 8 सेकंद या मुहूर्तावरच शहरातील श्रीराम मंदिराचा कलश रोहण सोहळा झाला. शहरातील विविध मंदिरात पहाटे पासून अभिषेक, महापूजा, दुपारी महाप्रसाद वितरण, महाआरती आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे लाईव्ह प्रक्षेपण पाहता यावे यासाठी भव्य एलईडी स्क्रीनची ठिकठिकाणी व्यवस्था करण्यात आली.

कलश रोहन ः राम-नामाचा जप
शहरातील लक्ष्मी व्यंकटेश देवस्थानात सोमवारी सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेदरम्यान शहरातील सर्व ज्येष्ठ नागरिक संघांतर्फे राम नाम जपाचे आयोजन करण्यात आले. सायंकाळी रोटरी इनरव्हिलतर्फे दीपप्रज्वलन करून मंदिरात दीपोत्सव साजरा करण्यात आला. म्युन्सीपल पार्क भागातील श्रीकृष्ण मंदिरात सकाळी महाअभिषेक व पूजा झाली. सकाळी आठ ते नऊ दरम्यान गीता पारायण तर सायंकाळी सहा ते सात वाजेदरम्यान भजन संध्या कार्यक्रम झाला. सायांकळी सात वाजेपासून रात्री दहा वाजेपर्यंत मंदिराच्या परिसरात दिवे लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला. जामनेररोडवरील भद्रकाली अष्टभुजा देवी मंदिरावर रोषणाई करण्यात आली तर सोमवारी पहाटे महाअभिषेक झाला. यानंतर सकाळी दहा वाजेपासून प्रसाद वितरण करण्यात आले. मरिमाता चौक व्यापारी मंडळ व मंदिर प्रशानाकडून 21 ते 23 या तिन दिवस दररोज सायंकाळी सात वाजता महाआरती झाली. सोमवारी सकाळी महाआरती होईल. अयोध्या येथील कार्यक्रमाचे मोठ्या एलईडी स्क्रिनवरुन थेट प्रक्षेपण दाखवण्यात आले. पुरातन चौकांच्या श्रीराम मंदिरात कलश रोपण 12 वाजून 29 मिनिट 8 सेकंद या मुहूर्तावर करण्यात आले. श्री रामचंद्र जी महाराज संस्थान ट्रस्टतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बडा हनुमान मंदिरात प्रभु श्रीरामचंद्रांना 501 भोग (नैवेद्य) दाखवण्यात आला. जामनेर रोडवरील गजानन महाराज मंदिरात दीपोत्सव साजरा करण्यात आला. टिव्ही टॉवर मैदानाजवळील पालिकेच्या उद्यानातील श्री साईबाबा मंदिर व जामनेररोडवरील साईबाबा मंदिरात सकाळी महाअभिषेक व त्यांनर साईचरित्र वाचन, महाआरती, महाप्रसाद वितरण करण्यात आले.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !