झुंडशाहीने कायदे आणि नियम बदलता येत नाही : मंत्री छगन भुजबळांचा सरकारला घरचा अहेर
Laws and regulations cannot be changed by mob rule: Minister Chhagan Bhujbal’s warning to the government नाशिक : मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेला सरकारमधूनच विरोध होत असून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी घरचा आहेर दिला आहे. मराठा आरक्षण अध्यादेश मसुद्याचे पत्र काढून मराठा समाजाचा विजय झाला असे म्हटले जात असले तरी मला काय तस वाटत नाही. झुंडशाहीने अशा प्रकारचे कायदे आणि नियम बदलता येत नाही. आम्ही सुद्धा शपथ घेताना कुठल्याही दबावाला बळी न पडता आम्ही निर्णय घेऊ अशी शपथ आम्ही सर्व मंत्रिमंडळानी घेतली आहे. मात्र ओबीसींना गाफील ठेऊन मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेतला जात आहे, याचा सर्वांनाच विचार करावा लागेल, असे भूजबळ म्हणाले आहेत.
आजचा निर्णय कायद्याच्या कसोटीतील नाही
मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत काढण्यात आलेल्या अध्यादेशानंतर आज नाशिक येथे मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी आरक्षण प्रश्नावरून जोरदार हल्लाबोल केला आहे. भुजबळ म्हणाले की, झुंडशाहीच्या नावाखाली कुणीही कुठले कायदे नियम करू शकत नाही. आज घेण्यात आलेला हा निर्णय कायद्याच्या कसोटीत बसणारा नाही. आता शासनाने केवळ एक मसुदा प्रसारीत केला असून याचं नोटिफिकेशनमध्ये रुपांतर नंतर होणार आहे. शासनाने यासाठी 16 फेब्रुवारी 2024 पर्यंत हरकती मागवल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील ओबीसी आणि इतर समाजाचे वकील, संघटना आणि नेत्यांनी याचा अभ्यास करून या हरकती पाठवण्याचे काम करावे असे आवाहन केले. तसेच अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने देखील लवकरच कायदेतज्ञांशी चर्चा करून हरकती नोंदविण्यात येतील, अशी माहिती त्यांनी दिली.








