मराठा समाज आरक्षण : भुसावळ तालुक्यात 30 हजार कुटूंबांचे सर्वेक्षण पूर्ण
Maratha community reservation : Completed survey of 30 thousand families in Bhusawal taluka भुसावळ : राज्य शासनाने मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्यभरात मराठा व अन्य संबंधीत वर्गाचे सर्वेक्षण सुरू केले आहे. भुसावळ तालुक्यातील 36 हजार 595 कुटूंबाचे सर्वेक्षण करण्याचे नियोजन आहे. यापैकी 30 हजार 251 कुटूंंबांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. भुसावळ तालुक्यात आतापर्यंत 82.66 टक्के कामकाज पूर्ण झाले आहे. मराठा समाजाला आरक्षणाच्या मुद्याबाबत अध्यादेश निघाला मात्र सर्वेक्षण सुरू ठेवण्यात आले आहे.
आंदोलनाची शासनाकडून दखल
राज्यात मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण व आंदोलन सुरु केले. यानंतर राज्यासह भुसावळ तालुक्यातही कुणबी नोंद शोधण्याची मोहिम सुरू करण्यात आली होती. भुसावळ तालुक्यात महसूल, शिक्षण, मुद्रांक व नोंदणी आदींसह विविध विभागांमध्ये 40 हजारांवर नोंदी आढळल्या होत्या. यानंतर शासनाने गेल्या आठवड्यात अध्यादेश काढून मराठा व अन्य समाजाच्या सर्वेक्षणाची मोहिम हाती घेतली होती. या मोहिमेत भुसावळ तालुक्यात प्रगणक व पर्यवेक्षकांच्या नियुक्ती करण्यात आल्या. या माध्यमातून भुसावळ तालुक्यात सर्वेक्षणाचे काम सुरू झाले. आतापर्यंत 36 हजार 595 कुटूंबांपैकी 30 हजार 251 कुटूंबांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले. शहरी भागात या सर्वेक्षणाला अद्याप गती आली नाही. मात्र ग्रामीण भागात चांगला प्रतिसाद मिळत आहे. पालिका हद्दीत संथगतीने सर्वेक्षण सुरू आहे. आगामी काही दिवसांत भुसावळ तालुक्यात ऑनलाईन सर्वेक्षण पूर्ण केले जाणार आहे.








