जामनेरातील राष्ट्रवादीचे नेते संजय गरूड कार्यकर्त्यांसह भाजपात
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले ; गिरीशभाऊंनी आता गरूडझेप घेवून काम करावे
Nationalist leader of jamner Sanjay Garud with BJP workers जामनेर : जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते संजय गरुड यांनी त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह मंगळवारी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केल्यानंतर जळगाव जिल्ह्यासह जामनेर विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडले आहे. राजकीय वर्तुळात या पक्ष प्रवेशाने अनेक चर्चांना उधाणही आले आहे.
ही तर राम-लक्ष्मणाची जोडी : उपमुख्यमंत्री
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत संजय गरुड यांचे मंत्री गिरीश महाजन यांनी स्वागत करून प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात विकसित भारताच्या प्रवासात आपले योगदान द्यावे, असे आवाहन केले. यावेळी संजय गरुड म्हणाले की, गिरीशभाऊंचे काम आम्ही पाहतो. जे काम त्यांनी केले आहे ते सर्व आमदारांनी करावे. अनेक कामे गिरीश महाजनांनी केली आहेत. ते नक्कीच चांगल्या मतांनी निवडून येणार असे म्हणत त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजनांना उद्देशून आज राम लक्ष्मणाची जोडी दिसत आहे, असेही गरुड म्हणाले.


गिरीशभाऊ आता गरूड झेप घ्या
यावेळी मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, मी सांगू शकत नाही एवढा आनंद मला आज झाला आहे. मी त्यांचे मनापासून अभिनंदन करतो. आता आपण मुख्य प्रवाहात आलो आहेत तर यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी सर्वांचे भाजपमध्ये स्वागत करतो. आता गिरिश भाऊ, संजय नाना आल्यावर तुम्ही गरुड झेप घेणार आहात. आधी घेतचं होता. पण आता गरुड सोबत आला आहे. दरम्यान, संजय गरुड यांच्या भाजप प्रवेशामुळे जामनेर विधानसभा मतदार संघातील राजकारण पूर्णपणे बदलून गेले आहे.






