भुसावळ शहरातील अमृत योजनेला गती देण्यासह पाणीप्रश्न न सुटल्यास आंदोलन
शिवसेनेचा इशारा : कुपनलिकांची दुरुस्ती करण्यासह लिकेज दुरुस्तीची अपेक्षा
Agitation if the water issue is not resolved along with speeding up Amrit Yojana in Bhusawal city भुसावळ : भुसावळ शहरासाठी अमृत योजना मंजूर करण्यात आली असलीतरी अनेक वर्षांपासून या योजनेचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. योजनेला तातडीने गती देण्यासह अनियमित पाणीपुरवठा थांबवून नियमित पाणीपुरवठा करावा, जीर्ण पाईप लाईनला लागलेली गळती थांबवावी तसेच अनेक भागातील कुपनलिका बंद असून त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी शिवसेना पदाधिकार्यांनी बुधवार, 18 रोजी पालिकेचे मुख्याधिकारी महेश वाघमोडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. निवेदनाची दखल न घेतल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला.
टंचाईग्रस्त भागात हवे टँकर
फेब्रुवारी महिन्याच्या सुरूवातीलाच नागरीकांना टंचाईच्या झळा जाणवत असून आगामी उन्हाळ्यात नागरीकांचे पाण्यासाठी अधिक हाल होणार आहे. या अनुषंगाने पालिकेने तातडीने टंचाईग्रस्त भागात टँकरने पाणीपुरवठा करावा, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली. शहरात सध्या 10 ते 15 दिवसांनी पाणीपुरवठा होतो व तोदेखील अनिश्चित स्वरूपात होत आहे. आगामी उन्हाळ्याचे दिवस पाहता शहराला पुरेसा व नियमित पाणीपुरवठा करावा, बंद पडलेल्या कुपनलिकांची दुरुस्ती करून त्या-त्या भागात नागरीकांची सोय करावी तसेच भुसावळ शहरात अनेक ठिकाणी विहिरी असून त्यावर इलेक्ट्रीक मोटार लावल्यास निश्चितच पाणीप्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.


मागण्या न मान्य झाल्यास आंदोलन
अमृत योजनेच्या टप्पा दोनला मंजुरी द्यावी व या वर्षात काम पूर्ण करावे अन्यथा शहरात शिवसेना स्टाईलने आंदोल करण्यात येईल व काही गंभीर परीस्थिती निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी पालिका प्रशासनाची राहील, असा इशारा देण्यात आला आहे. निवेदन देताना शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख दीपक धांडे, माजी नगरसेवक मुकेश गुंजाळ, पप्पू बारसे, अॅड.कैलाश लोखंडे, अॅड.नरेंद्र लोखंडे, दिलीप सुरवाडे, निलेश महाजन, बबलू बर्हाटे, युवा सेना जिल्हाप्रमुख सुरज पाटील, बबलू धनगर, शरद जैस्वाल, स्वप्नील सावळे, पिंटू भोई, राकेश खरारे, अरुण साळुंके, महमूद शेख, मनोज पवार, शरद जोहरे यांच्या सह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.
165 कोटींवर योजना जावूनही काम नाही
शिवसेनेचे शहरप्रमुख दीपक धांडे म्हणाले की, भुसावळसाठी 2016 मध्ये 65 कोटींची अमृत योजना मंजूर झाली होती मात्र ही योजनेचा खर्च आता 165 कोटींवर पोहोचला आहे मात्र तरीदेखील योजनेचे काम पूर्ण झालेले नाही. अमृत- टप्पा दोनच्या कामाांनाही मंजुरी मिळालेली नाही. आमदार संजय सावकारे यांनी लक्ष घालून तातडीने मंत्रालयात बैठक लावावी, अशी अपेक्षाही धांडे यांनी यावेळी व्यक्त केली.






