भुसावळ पालिकेची 11 टक्के वसुली चिंताजनक बाब
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद : वाळू माफियांच्या प्रॉपर्टीवर बोजे ; कमर्शियल वाहनांना जीपीएस लावणार
11 percent recovery of Bhusawal Municipality is a matter of concern भुसावळ : नाशिक विभागात एकमेव ‘अ’ वर्ग पालिका भुसावळची असलीतरी वार्षिक वसुली केवळ 11 टक्के असल्याची बाब निश्चितच चिंताजनक आहे. शहरात विकासकामे होण्यासाठी नागरीकांनी व बड्या थकबाकीदारांनी करांचा नियमित भरणा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी येथे केले. पालिकेची आढावा बैठक झाल्यानंतर प्रांताधिकारी कार्यालयात त्यांनी पत्रकार परीषद घेत माध्यमांशी संवाद साधला. जिल्हाधिकारी म्हणाले की, वाळू माफियांकडून हल्ल्यांचे वाढते प्रमाण चिंताजनक असून त्यांच्यावर कठोर कारवाई केली जात आहे. जिल्ह्यातील कमर्शियल वाहनांना जीपीएस प्रणाली लावण्यात येत असून वाळू माफियांच्या प्रॉपर्टीवर बोजे लावण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
पालिकेची 11 टक्के वसुली : दुर्दैवी बाब
भुसावळ पालिकेबाबत जिल्हाधिकार्यांनी आढावा बैठक घेतल्यानंतर त्यात केवळ 11 टक्के वसुली झाल्याचे समोर आल्यानंतर जिल्हाधिकार्यांनी प्रशासक तथा सहाय्यक उपजिल्हाधिकारी व मुख्याधिकारी महेश वाघमोडे यांच्याकडे तीव्र नाराजी व्यक्त करीत वसुली वाढण्याच्या सूचना केल्या. पत्रकार परीषदेतही जिल्हाधिकार्यांनी अल्प वसुली चिंतेची बाब असल्याचे सांगत वसुली नसल्यास शहरात विकासाची कामे करणार कशी? असा प्रश्न उपस्थित केला. शहरात वेळोवेळी स्वच्छता व वेळेवर पाणीपुरवठा करण्याचा पालिकेचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले. बडे थकबाकीदार पालिकेची थकबाकी भरत नसल्याने अशांवर कारवाईचे सुतोवाच त्यांनी यावेळी केले. भुसावळसाठी दहा कलमी कार्यक्रम राबवणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.


असा आहे दहा कलमी कार्यक्रम
घरकुल योजना राबवणे, घरकुल लाभार्थींचा मेळावा आयोजित करणे, डीपीडीसीतील शंभर टक्के वर्क ऑर्डर पूर्ण करणे, शहरात होत असलेल्या विकासकामांचे थर्ड पार्टी ऑडीट म्हणून शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाला सूचना, आमदार निधीतून मंजूर झालेली शंभर टक्के कामे पूर्ण करणे, शहरातील कचरा 30 मिनिटात हटवणे, मुख्याधिकार्यांना देशातील सर्वात स्वच्छ शहर इंदौरची पाहणी करण्यास पाठवून डीप क्लीन सीटी मोहिम राबवण्याचा निर्धार जिल्हाधिकार्यांनी यावेळी व्यक्त केला. कचरामुक्त शहर ही नागरीकांचीही तितकीच जवाबदारी असल्याचे यावेळी जिल्हाधिकार्यांनी सांगितले.
बोगस वोटींग रोखण्यावर भर
आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने भुसावळ तहसील प्रशासनाने अत्यंत कौतुकास्पद कामगिरी केल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. मतदार याद्या अद्यावतीकरण, नवीन मतदारांची नोंदणी तसेच तक्रारींचे निरसनही उत्तम प्रकारे करण्यात आल्याचे ते म्हणाले. निवडणुकीत बोगस पद्धत्तीने होणारे वोटींग रोखण्यासाठी प्रशासनाने मतदान कार्डावरील यापूर्वीचे ब्लॅक अॅण्ड व्हाईट फोटो रद्द करीत कलर फोटो लावले आहेत तर सारखे नाव असलेले 2600 मतदारांची नावे मतदान यादीतून वगळली आहेत. आयडेंटी व्हेरिफिकेशनसाठी बीएलओ होम टू होम तीनवेळा मतदारांच्या घरी जाणार असल्याचेही ते म्हणाले. मतदान केंद्रावर प्रत्येक पक्षाचाप बीएलए (बुथ लेव्हल एजंट) असेल त्यामुळे बोगस मतदानाला आळा बसेल, असेही ते म्हणाले. भुसावळ पोलिस प्रशासनाच्या कामाबाबतही जिल्हाधिकार्यांनी कौतुक केले. मोठ्या प्रमाणावर हद्दपारी तसेच एमपीडीच्या कारवाया करण्यात आल्याचे त्यांनी सांगत अशीच पद्धत्तीने कारवाया सुरू ठेवाव्यात, असेही त्यांनी सांगितले.
घरकुल आरक्षणाचा प्रस्ताव देणार
भुसावळ रेल्वे हद्दीतील अतिक्रमण हटवण्यात आल्यानंतर बेघर झालेल्या नागरीकांना सर्वे क्रमांक 63 वरील जागेवर घरकुल देण्यात येणार होते मात्र या जागेवर उद्यानाचे आरक्षण असल्याची बाब जिल्हाधिकार्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर ते म्हणाले की, उद्यानाचे निश्चितच आरक्षण लवकरच हटवण्यात येईल व प्रशासक त्या संदर्भात पाठपुरावा करतील. वाळू माफियांच्या वाढत्या हल्ल्याबाबत जिल्हाधिकार्यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, अवैध वाळूवर सातत्याने कारवाया केल्या जात असल्याने वाळू माफियांकडून हल्ले केले जात आहेत मात्र उपद्रवींना आम्ही सोडणार नाही. त्यांच्या मालमत्तांवर बोजे लावण्यात येतील शिवाय एमपीडीए सारख्या कारवाया आणखी वाढवू, असेही ते म्हणाले.
भूखंडांवरील अतिक्रमणबाबत लवकरच कारवाई
भुसावळ पालिकेच्या अनेक भूखंडांवर अतिक्रमण करण्याचा आल्याचा प्रश्न जिल्हाधिकार्यांना विचारल्यानंतर ते म्हणाले की, अतिक्रमण नियमाकुलही करता येते, प्रत्येकवेळी बुलडोजर फिरवणे हा पर्याय नक्कीच नाही. अशावेळी दंडात्मक कारवाईदेखील करता येईल, या संदर्भात प्रशासकांना आपण कारवाईचे निर्देश देवू, असेही ते म्हणाले. भुसावळ शहरात मोठ्या प्रमाणावर अवैधरीत्या वाळू साठे करण्यात आल्याच्या प्रश्नावर या संदर्भात लवकरच वाळू साठा जप्तीची कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. पत्रकार परीषदेला सहाय्यक उपजिल्हाधिकारी अर्पित चव्हाण, तहसीलदार नीता लबडे, मुख्याधिकारी महेश वाघमोडे, नायब तहसीलदार अंगद आसटकर आदींची उपस्थिती होती.
आढावामुक्त व्हावी निवडणूक : जिल्हाधिकारी
प्रांताधिकारी कार्यालयात जिल्हाधिकार्यांनी नोडल व सेक्टर ऑफिसर यांची आढावा बैठक घेतली. यावेळी ते म्हणाले की, आगामी निवडणूक ही अत्यंत अचूक व आढावामुक्त निवडणूक व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. इलेक्शन कमिशन्सच्या गाईड लाईन वाचून काम करा, अशा सूचना त्यांनी केल्या. आतापासून अत्यंत बारकाईने काम करा जेणेकरून निवडणुकीत आपल्याला आढावा घेण्याची गरज भासणार नाही, असेही त्यांनी सांगितले.






