पीक विम्याबाबत भविष्यात अडचणी येणार नाही : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद
यावलः जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी यावल येथे भेट देत येथील महसूल विभाग नगरपालिकेसह शासकीय कार्यालयाचा आढावा घेतला. बैठकीत जिल्हा जिल्हाधिकारी यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसह नियमित कार्यालयीन कामकाज संदर्भात सुचना दिल्या. तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, गटविकास अधिकारी मंजुश्री गायकवाड उपस्थित होत्या. शासकीय आढावा बैठकीनंतर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, यावल तालुक्यातील दुर्गम भागातील मतदान केंद्र, वाहन व्यवस्था, मतदारांच्या नावांची खात्री केली आहे.
तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी महसूल वसुली तसेच गौण खनिज चोरीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवले आहे.पीक पाहणी सध्या शेतकरी स्वत:करीत असल्याने विम्याबाबत भविष्यात अडचणी येणार नाहीत, असेही त्यांनी सांगितले.


अल्प वसुलीबाबत जिल्हाधिकार्यांची नाराजी
यावल नगरपालिका कर वसुलीबाबत जिल्हाधिकारी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. पालिकेची वसुली केवळ 11 टक्केच झाली असल्याचे सांगून वसुलीबाबत सक्त सुचना दिल्याचे ते म्हणाले. पालिकेचे उत्पनाचे मुख्य स्त्रोत करवसुली असल्याचे सांगून करवसुली झाली तरच शहराचा विकास होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. स्वच्छतेबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. शहरातील 15 विकासात्मक कामांपैकी 10 कामे पूर्ण तर पाच कामे प्रगतीपथावर असल्याचे सांगितले. पंचायत समितीच्या कार्याबाबत ही त्यांनी समाधान व्यक्त केले.






