मोठी बातमी : राज्यातील प्राथमिक शाळांच्या वेळा बदलल्या
Big News: Timings of primary schools in the state have changed मुंबई : पाल्यांची झोप सकाळी पूर्ण होत नसतानाही त्यांना शाळेत पाठवावे लागत असल्याने त्याचा परीणाम विद्यार्थ्यांच्या दिवसभरातील कामकाजासह अभ्यासावर होत होता. ही बाब लक्षात घेता आता महाराष्ट्रातील प्राथमिक शाळांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत. राज्यभरातील खाजगी व प्राथमिक शाळांमधील चौथीपर्यंतचे वर्ग सकाळी नऊ नंतर भरणार आहेत. विद्यार्थ्यांच्या स्वास्थासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वीच राज्यपालांनी राज्यातील शाळांच्या वेळा बदलण्याच्या सूचना दिल्या होत्या.
राज्यपालांचे वेळेबाबत निर्देश
प्राथमिक शाळांची वेळ सकाळी 9 नंतर असावी असे राज्यपालांनी सुचवले होते. त्यानुसार राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथीपर्यंतचे वर्ग सकाळी 9 किंवा 9 वाजेनंतर भरवण्याबाबतचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांची पूर्ण झोप होत नाही त्यामुळे त्यांना मानसिक त्रास सहन करावा लागतो या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला.


सरकारने जारी केले आदेश
आधुनिक युगात बदलती जीवनशैली, मनोरंजनाची विविध साधने, शहरातील उशिरापर्यंत सुरु असलेले ध्वनिप्रदूषण उदा. वाहनांचा आवाज, विविध कार्यक्रमांच्या अनुषंगाने वाजविले जाणारे कर्कश संगीत आदी अशा अनेक कारणांमुळे विद्यार्थी रात्री उशीरा झोपत आहेत व सकाळी लवकर शाळा असल्याने त्यांची झोप पूर्ण होत नाही. ज्याचा नकारात्मक परिणाम विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर होताना दिसत आहे. मोसमी हवामान, विशेषतः हिवाळा व पावसाळा या ऋतूमध्ये सकाळी लवकर उठून शाळेत जाणे. पावसामुळे व थंडीमुळे अनेक विद्यार्थ्यांना त्रास होतो. ते बहुदा आजारी पडतात. सकाळी पाल्याला लवकर तयार करणे, जेवणाचा डबा तयार करणे आणि पाल्याला वेळेत शाळेत सोडणे यामुळे देखील अनेक पालकांची ओढाताण होते. सकाळी लवकर भरणार्या शाळेतील विद्यार्थ्याना बस व व्हॅनद्वारे नेताना रस्त्यावरील धुके, पाऊस यामुळेही अडचणी निर्माण होत असल्याने राज्यभरातील शाळांची वेळ आता बदलण्यात येत असल्याचे आदेशात नमूद आहे.






