मुंबई हादरली : फेसबुक लाईव्हदरम्यान ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या
Mumbai shook : Abhishek Ghosalkar, a former corporator of the Thackeray group, was shot dead during a Facebook live मुंबई : दहिसरचे माजी नगरसेवक तथा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे पूत्र अभिषेक घोसाळकर यांची फेसबुक लाईव्हदरम्यान गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्यानंतर मुंंबईत खळबळ उडाली आहे. गुंड मॉरिस नोरोन्हा याने ही हत्या केली असून गोळीबारानंतर त्याने स्वतःवरही गोळ्या झाडल्याने त्याचाही मृत्यू ओढवला. पोलिसांकडून या गंभीर प्रकरणात अत्यंत बारकाईने तपास केले जात असून शुक्रवारी सकाळी मेहुल पारीख आणि रोहित साहू यांना ताब्यात घेण्यात आले आहे तर तसेच 1 पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसंही जप्त केली आहेत.
साड्या वाटपाच्या कार्यक्रमात बोलावत केली हत्या
अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येपूर्वी लालचंद पाल हे स्वत: त्यांच्यासोबत होते. गोळीबार झाला तेव्हा घटनास्थळीच असलेल्या पाल यांनी तिथे नेमकं काय झालं? तो थरारक अनुभव सांगितला. ‘एका मराठी वृत्तवाहिनी’शी बोलताना लालचंद पाल म्हणाले की, काल सकाळी अकरा वाजता अभिषेक घोसाळकर यांना मॉरिसचा फोन आला की, संध्याकाळी महिलांना साड्या वाटपाचा कार्यक्रम आहे. पण साडी वाटण्याआधी, मॉरिसने अभिषेक घोसाळकर यांना फेसबुक लाईव्ह करण्यासाठी त्याच्या ऑफिसमध्ये नेले. मी त्यांच्यासोबत होतो. मॉरिसच्या कार्यालयात दोघंही बोलत होते. मी खूप वेळ झाल्यामुळे दरवाजा उघडूनमध्ये गेलो, तेव्हा दोघं मोबाईलद्वारे फेसबुक लाईव्ह करत होते. मी गेल्यावर थोड्यावेळाने आम्ही येतो, असं बोलून मॉरिसने मला बाहेर काढलं, असं लालचंद पाल यांनी सांगितले. त्यानंतर बंदुकीच्या गोळीचा आवाज आला आणि मी आत धावलो, तर अभिषेक हे खाली पडला होता आणि मॉरिस त्याच्यावर गोळीबार करत होता. बंदुकीतील गोळ्या संपल्यानंतर सुद्धा मॉरिस सतत अभिषेक यांच्यावर गोळीबार करत होता, असं लालचंद पाल यांनी म्हणाले. मॉरिस आणि अभिषेकमध्ये आधीच वाद झाला होता, तो संपवण्यासाठी ख्रिसमसच्या वेळी मॉरिसने अभिषेक यांचे बॅनर पोस्टर लावून जवळीक वाढवल्याची माहिती समोर आली आहे.


अत्याचाराचा गुन्हा
मॉरिसविरुद्ध लैंगिक अत्याचाराचा एक गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यात त्याला अटक झाली होती. सध्या तो जामिनावर होता. लैंगिक अत्याचाराची खोटी तक्रार करण्यामागे अभिषेकचा हात असल्याचा संशय मॉरिसला होता. त्या रागातून हा प्रकार घडल्याचेही बोलले जाते. काही दिवस न्यायालयीन कोठडीत राहिल्यानंतर त्याला कोर्टाने जामीन मंजूर केला होता.
कोण आहेत अभिषेक घोसाळकर?
माजी आमदार विनोद घोसाळकर यांचा मुलगा असलेले अभिषेक दोन वेळा दहिसर कांदरपाडा 7 येथून नगरसेवक म्हणून निवडून आले होते. मुंबई बँकेच्या संचालकपदीही ते कार्यरत होते.
कोण आहे मॉरिस भाई?
एक समाजसेवक म्हणून मॉरिस भाईची ओळख आहे. मॉरिस नरोना ऊर्फ मॉरिस भाई असं त्याचे नाव आहे. मॉरिस भाई बोरिवली पश्चिमेच्या आयसी कॉलनीतील रहिवाशी आहे. दरम्यान मॉरिसवर बलात्कार, खंडणी आणि फसवणुक असे विविध गुन्हे दाखल आहेत. एका महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप मॉरिसवर असल्याच समोर आले आहे. तसेच त्याने वॉर्ड नंबर 1 मधून महापालिकेची निवडणूकही लढवली होती. तो समाजसेवेतही पुढे होता. लोकांना कपडे फळ आणि धान्य वाटण्याचं कामात तो पुढे होता. गुरुवारीदेखील अशाच एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात अभिषेक घोसाळकरांना उपस्थिती लावली होती. तेव्हाच ही घटना घडली आहे.






