भाजपाचे ‘गाव चलो’ अभियान : भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल जावळे वरणगावात मुक्कामी राहून करणार पक्षाचा प्रचार
भुसावळ : भारतीय जनता पार्टीने लोकांपर्यंत पोहचण्यासाठी ‘गाव चलो’ अभियान राबवण्याचा निर्णय घेतला आहे. मोदी सरकारच्या योजना जनतेत पोहचविल्या जाणार असून मोदींच्या गॅरंटीचा प्रसार केला जाणार आहेत तसेच आगामी निवडणुकांमध्ये भाजपाला 51 टक्क्यांहून अधिक मतदान कसे होईल यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याचे भारतीय जनता पार्टी जळगाव पूर्व जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांनी म्हटले आहे.
24 तास करणार पक्षाचा प्रचार
या अभियानात वातावरण बदलवून घरा-घरांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. या अभियानात ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन व जिल्ह्यातील खासदार, आमदार, पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमवेत जिल्हाध्यक्ष अमोल जावळे हे सुध्दा एका गावात बुथ पातळीवर मुक्कामी राहून पक्षाचा प्रचार करणार आहेत. यात शनिवारी जिल्हाध्यक्ष भुसावळ विधानसभा मतदारसंघातील वरणगाव येथे मुक्कामी राहणार आहेत. या अभियानात ते 24 तास वरणगावात मुक्कामी राहून बूथ स्तरावर भाजपाचा प्रचार करणार आहे.


18 कलमी कार्यक्रम राबवणार
भाजपाच्या गाव चलो अभियानात ते सर्वांशी संवाद साधणार आहेत. मोदी की गॅरंटीचा नारा गावोगावी पोहोचविला जाणार आहे. गाव चलो अभियानात बूथ प्रमुखांशी बैठक घेणे, मतदार यादी वाचन करणे, कार्यकर्त्यांशी संवाद साधणे, नमो अॅपबाबत प्रचार करणे, हॅन्ड बिल वाटप करणे, वरीष्ठ मंडळींशी चर्चा, युवकांसाठी नमो चषकचे आयोजन करणे, सामाजिक संस्थांशी चर्चा करणे, दिवार लेखन काम करणे असे एकूण 18 कार्यक्रम राबविले जाणार आहेत.






