सावदा येथे संतप्त नागरीकांनी नगरपालिकेसमोर टाकला कचरा
सावदा : गेल्या काही दिवसापासून नागरीकांनी तक्रारी केल्यानंतर शहरातील गटारी साफसफाई करण्याचे काम पालिकेने हाती घेतले मात्र गटारी स्वच्छ केल्यानंतर त्यातून काढलेली घाण नागरीकांच्या दारापुढे पडून असल्याने संतप्त नागरीकांनी ही घाण (कचरा) उचलून पालिकेच्या प्रवेशद्वारा समोर टाकल्याने शहरात मोठी खळबळ उडाली.
संतप्त नागरिकांनी कचरा टाकला पालिकेच्या दारात
शुक्रवार, 16 रोजी दुपारी एक वाजे दरम्यान मोठा आखाडा, रविवार पेठ भागातील संतप्त नागरीकांनी गाळ भरून आणला व नगरपालिकेसमोर टाकून आपला संताप व्यक्त केला. यावेळी नागरीकांनी आरोग्य विभागात जाऊन आरोग्य निरीक्षक सचिन चोळके यांना जाब विचारला तर शहरातील कचरा उचलणार्या ठेकेदाराच्या माणसांने सदर कचरा उचलण्याची जवाबदारी आपली नसल्याचे सांगत हात यापूर्वीच झटकले होते. आपला फक्त कचरा उचलण्याचा संबंध असून सदर गाळ ज्या ठेकेदार याने काढला, त्यानेच गाळ उचलावा, अशी भूमिका मांडली होती त्यामुळे गाळ न उचलला गेल्याने आजची परिस्थिती ओढवली परंतु यात त्रास मात्र नागरीकांना झाला. मुजोर ठेकेदार यास आरोग्य विभाग वेळोवेळी पाठीशी घण्याचे काम करीत आहे, असा संतापदेखील व्यक्त झाला.


नागरीकांनी व्यक्त केला संताप
यावेळी शिवसेना शिंदे गट शहराध्यक्ष सुरज परदेशी, भाजपा आरोग्य आघाडी तालुकाध्यक्ष रीतेश पाटील, गुलाम शेख अश्रफ मंजूर, गुलाम शेख फरीद मंजूर यांच्यासह नागरीक उपस्थित होते. यावेळी उपस्थित नागरीकांनी प्रचंड संताप व्यक्त केला. दरम्यान, सावदा पाकिकेत मुख्याधिकारी यांची बदली झाल्याने सुमारे दहा ते बारा दिवसापासून येथे मुख्याधिकारी नाही, नगरपालिका वार्यावर आहे, नागरीरकांच्या समस्या सोडविण्यास कोणीही अधिकारी नाही, प्रशासक येऊन फिरकत नाही, अशी येथील स्थिती आहे.






