भुसावळात रेलसिटी रनमध्ये धावले 750 भुसावळकर
शेवंता पावरा, जयेश पाटील प्रथम तर सोमनाथ पावराने अनवाणी धावून मिळवला व्दितीय क्रमांक
750 Bhusawalkars ran in Railcity Run in Bhusawal भुसावळ : रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेलसिटी व आमदार संजय सावकारे आयोजित रोटरी रेलसिटी रन या मॅरेथॉन स्पर्धेत 750 पेक्षा अधिक भुसावळकरांनी सहभाग नोंदवून पर्यावरण व निरामय आरोग्याचा संदेश दिला. मॅरेथॉनमध्ये पाच वर्षीय बालकापासून 75 वर्षीय ज्येष्ठ नागरीकांपर्यंतच्या विविध वयोगटातील स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. मॅरेथॉन मार्गावर ठिकठिकाणी पुष्प उधळण आणि ढोल ताशांचा गजर करण्यात आला.
तीन गटात स्पर्धा
रविवार, 25 रोजी पहाटे सहा वाजेपासून स्पर्धेला डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानावरुन सुरुवात झाली. 10 किमी, पाच किलोमीटर आणि तीन किलोमीटर अशा तीन विभागात ही स्पर्धा झाली. ए.पी.एस. फिटनेसच्या टीमने झुंबा सेशन घेऊन वॉर्म अप केले. मॅरेथॉन सदिच्छा दुत भुसावळच्या डीआरएम ईती पांडे यांनी स्पर्धेला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली. पारीतोषिक वितरण वेळी व्यासपीठावर आमदार संजय सावकारे, उपमुख्याधिकारी लोकेश ढाके, ओबेनॉल केमिकलचे आश्विन परदेशी, साईजीवन सुपर शॉपचे क्रिश कोठारी, रोटरी अध्यक्ष मनोज सोनार, प्रोजेक्ट चेअरमन डॉ.मकरंद चांदवडकर आदी उपस्थित होते.



अनवाणी धावून द्वितीय क्रमांक पटकावला
याप्रसंगी विजेत्यांना रोख पारीतोषिक तसेच चषक देऊन गौरवण्यात आले. यासोबतच लकी ड्रॉ काढून स्मार्ट वॉच, ब्लूटूथ स्पीकर आणि एल.ई.डी.टीव्ही बक्षीस म्हणून वितरण करण्यात आले. दहा किलोीटर किमी स्पर्धेत सोमनाथ पावरा याने अनवाणी धावून द्वितीय क्रमांक पटकावला. याबद्दल आमदार सावकारे यांनी त्याचे विशेष कौतुक करून त्याला बुटांसाठी आर्थिक मदतदेखील केली.
एनर्जी ड्रिंकची व्यवस्था
स्पर्धकांना थकवा जाणवू नये म्हणून मार्गात ठिकठिकाणी पिण्याचे पाणी आणि एनर्जी ड्रिंकची देखील व्यवस्था होती. रोटरीचे स्वयंसेवक आणि पोलीस प्रशासनाने धावपटू सुरक्षिततेसाठी रहदारीचे नियमन चोख ठेवले. यासोबतच भुसावळ तालुका क्रीडा शिक्षक संघटनेतर्फे स्पर्धेच्या तांत्रिक बाजू अचूकपणे सांभाळण्याचे उत्कृष्ठ कार्य करण्यात आले.
स्पर्धेतील विजेते असे-
10 किमी महिला गट- प्रथम- शेवंता पावरा, द्वितीय अश्विनी मोरे, तृतीय वैशाली कोळी तर 10 किमी पुरुष गटात प्रथम जयेश पाटील , द्वितीय सोमनाथ पावरा, तृतीय आकाश कोळी.
5 किमी महिला गटातून प्रथम- जान्हवी सरोदे, द्वितीय- अनिता बारेला, तृतीय- शिवानी पाटील. 5 किमी पुरुष गटातून प्रथम- मुकेश धनगर, द्वितीय अभिषेक बिरपान, तृतीय- निखील यमनेरे
3 किमी महिला गटातून प्रथम- ममता कोल्हे, द्वितीय प्रिया बारी, तृतीय वैष्णवी जमाले. 3 किमी पुरुष गटातून प्रथम- महेश निकम, द्वितीय- कुणाल बोरसे , तृतीय- तुषार झटके.
हे ठरले लकी ड्रॉ चे भाग्यवान विजेते
स्मार्ट वॉच विजेते- किशोर सावदेकर, चेतन पाटील, जयसिंह पावरा, जयश्री पावरा, सुप्रिया सपकाळे. ब्लूटूथ स्पीकर विजेते- अंकुश पाटील, मंजू कुशवाह, सम्यक तीलोट, निलेश पाटील, इशिता चौधरी दर एलईडी टीव्ही विजेता- अथर्व कोल्हे.





