सावदा ग्रामीण रुग्णालयाचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते व्हर्च्युअल पद्धतीने उद्घाटन
Virtual inauguration of Savada Rural Hospital by Prime Minister Modi सावदा : सावदा शहरातील सुमारे 19 हजार स्केअर फूटमध्ये विस्तारलेल्या व 30 सुमारे खाटांचे व सुमारे तीन कोटी रुपये खर्चून उभारलेल्या सावदा येथील ग्रामीण रुग्णालयाचे चलचित्र, व्हर्च्युअल पद्धतीने रविवार, 25 रोजी दुपारी 4.30 वाजे दरम्यान राजकोट (गुजरात) येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते उद्घाटन झाले.
यांची होती उपस्थिती
यावेळी सावदा येथील ग्रामीण रुग्णालयात खासदार रक्षा खडसे, जिल्हा परीषदेचे माजी उपाध्यक्ष नंदू महाजन, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.किरण पाटील, रावेर येथील पद्माकर महाजन, हिरालाल कोळी, पी.के.महाजन, माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे, माजी नगराध्यक्षा देवयानी बेंडाळे, माजी नगराध्यक्षा हेमांगी चौधरी, माजी नगराध्यक्षा अनिता येवले, माजी नगरसेविका रंजना भारंबे, नीलिमा बेंडाळे, लीना चौधरी, करुणा पाटील, जयश्री नेहेते, बेटी बचावच्या संयोजिका सारीका चव्हाण, भाजप तालुकाध्यक्ष महेश चौधरी, भाजप शहराध्यक्ष जितेंद्र भारंबे, उपाध्यक्ष सचिन बर्हाटे, सै.अजगर सै.तुकडू यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.



नामकरणावरून गोंधळ
ज्या जागेवर हे ग्रामीण रुग्णालय उभारण्यात आले आहे त्या जागेवर पूर्वी सावदा नगरपालिकेचे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय नाव होते तर ही जागा पालिकेने शासनास दिली. यावेळीच ग्रामीण रुग्णालयास छत्रपती शिवाजी महाराज हे नाव द्यावे, असा ठराव करून ही जागा शासनास देण्यात आली मात्र त्यानंतर वेळोवेळी माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी यांनी रुग्णालय तयार झाल्यावर त्यास हेच नाव द्यावे, अशी मागणी देखील मात्र जिल्हा आरोग्य विभागाकडून दखल घेण्यात आली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते ऑनलाईन उद्घाटन झाल्यावरही उपस्थित राजेंद्र चौधरी व समर्थकांनी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय नामक बॅनर आणून ते प्रवेशद्वाराजवळ लावले व ग्रामीण रुग्णालय नामक फलक पांढर्या कापडाने झाकला. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.किरण पाटील यांना माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी व राजेश वानखेडे यांनी धारेवर धरत आम्ही निवेदन देऊन देखील रुग्णालयास सदर नाव का दिले नाही ? याबाबत जाब विचारला व तत्काळ येथे हे नाव मुख्य गेटवर देण्याची मागणी केली. शहरवासीयांनीही आक्रमक पवित्रा यावेळी घेतला. खासदार रक्षा खडसे तसेच नंदू महाजन यांनीदेखील या बाबतीत लक्ष घालून तत्काळ येथे नाव देण्यासाठी वरीष्ठांशी बोलू, असे आश्वासन यावेळी दिले.





