भुसावळात ओबेनॉल फाऊंडेशन प्रस्तुत 14 व्या खान्देश नाट्य महोत्सवाला सुरूवात
माणसातला देव ओळखण्याचा ‘वारी’ तून संदेश
Launch of 14th Khandesh Theater Festival presented by Obenol Foundation in Bhusawal
भुसावळ : माणसातला देव ओळखण्याचा संदेश देणार्या ‘वारी’ या बालनाट्याच्या सादरीकरणाने 14 व्या खान्देश नाट्य महोत्सवाची शुक्रवार, 1 मार्चपासून सुरुवात झाली. उत्कर्ष कलाविष्कार आयोजित व ओबेनॉल फाऊंडेशन प्रस्तुत नानासाहेब देविदास फालक यांच्या स्मृतीनिमित्त या महोत्सवाचे आयोजन केले जाते. रेल्वेच्या कृष्णचंद्र सभागृहात महोत्सवाचे उद्घाटन ओबेनॉल फाऊंडेशनचे संजयसिंग परदेशी यांच्याहस्ते नाटकाची घंटा वाजवून झाले.
यांची होती उपस्थिती
यावेळी अंजली परदेशी, ज्येष्ठ नागरिक व व्यापारी पंडितराव सुरवाडे, ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मोहन फालक, चेअरमन महेश फालक, प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे, संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळाचे अध्यक्ष महेंद्र मांडे, न्यू जवाहर डेअरीचे संचालक सुरेश पाटील, आनंद ड्रेसेसचे संचालक सुनील जैन, मल्हार हॉटेलचे संचालक प्रमोद धनगर प्रमुख पाहुणे उपस्थित होते.



समाजाला निश्चितच होणार फायदा
मोहन फालक म्हणाले की, महोत्सवातून मनोरंजना बरोबरच अंतर्मुख करणार्या नाटकांची मेजवानी रसिकांना मिळणार असल्याने त्याचा समाजाला निश्चितच फायदा होईल. सुनील जैन म्हणाले की, नाटक ही जिवंत कला असून समाजाला दिशा देण्याचे काम करते. ही कला जिवंत ठेवण्यासाठी नाट्य कलावंतांना प्रोत्साहन देणे व त्यांच्या पाठीशी समर्थपणे उभे राहणे आवश्यक आहे. रजनी सावकारे यांचेदेखील भाषण झाले. नटराज पूजन व नानासाहेब फालक यांच्या प्रतिमेस माल्यार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रसिद्धी प्रमुख सुशील पाटील तर सूत्रसंचालन अध्यक्ष अनिल कोष्टी यांनी केले.
‘वारी’तून माणसात देव ओळखण्याचा संदेश
वरणगाव येथील चाटे पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ‘वारी’ हे बालनाट्य सादर केले. यात तब्बल 44 पेक्षा जास्त बाल कलावंत सहभागी झाले. या नाटकाची निर्मिती प्रमुख राहुल सोनार यांनी केली आहे. दिग्दर्शक अजय पाटील आहेत. विठ्ठल दर्शनासाठी दरवर्षी पंढरपूर कडे निघणार्या वारीकडे नकारात्मक व सकारात्मक दृष्टिकोनातून पाहतांना माणसात असलेला देव ओळखा असा संदेश या बालनाट्यातून देण्यात आला. त्यानंतर हनुमान सुरवसे लिखीत व उमेश गोरधे दिग्दर्शीत उत्कर्ष कलाविष्कारची ‘सेल नसलेला रेडिओ’ ही एकांकिका सादर करण्यात आली. पैश्यापेक्षा आपले कुटुंब आपली माणसं जास्त महत्वाची असतात हा संदेश या एकांकिकेतून देण्यात आला. सायंकाळी पुण्याच्या आजकल संस्थेचे ‘खरा इन्स्पेक्टर मागावर’ व नाशिकच्या सपान या संस्थेचे ‘तो राजहंस एक’ हे नाटक सादर झाले. शनिवार, 2 रोजी संध्याकाळी ‘व्हाया सावरगाव खुर्द’ व टायनी टेल्स थिएटर निर्मित ‘कडेकोट कडेकोट’ ही दोन नाटके सादर होतील.
भविष्यात ओबेनॉल नाट्यगृह उभारणार !
भुसावळात नाट्यगृह व्हावे म्हणून शासनदरबारी कलावंत व रसिकांनी अनेकदा निवेदने दिली. राजकीय पुढार्यांनी आश्वासना पलिकडे काही दिले नाही. अखेर दहा वर्षापासून ही मागणी करणेच सोडून दिले मात्र आज अनिल कोष्टी यांनी आपल्या प्रास्ताविकात ओबेनॉल फाउंडेशनचे संचालक अश्विनीकुमार परदेशी यांच्या फाउंडेशनच्या माध्यमातून भविष्यात नाट्यगृह बांधण्याचा विचार असल्याचे सांगताच उपस्थित कलावंतांना सुखद धक्का बसला.





