महायुतीचे जागा वाटपाचे ठरले ; असा आहे जागांचा फार्म्युला !
It was decided to distribute the seat of Mahayuti; This is the formula of places!
मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीने जागा वाटपाचा फॉर्म्यूला निश्चित केला असून त्यानुसार महायुतीत 32 जागा भाजपाला तर शिवसेना (शिंदे गट) 10 तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला सहा जागा दिल्या जाणार असल्याची माहिती आहे. मिशन 400 मध्ये भाजपला कोणताही धोका पत्करायचा नाही, यासाठी सर्वाधिक जागा भाजपच्या चिन्हावर लढण्याच्या सूचना भाजप कार्यकर्त्यांना देण्यात आल्या आहेत. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीनंतर राज्यातील जागेबाबत अधिकृत घोषणा केली जाणार आहे.
कामाला लागा : अमित शहांच्या सूचना
भाजप लोकसभेत 30 ते 32 जागांवर निवडणूक लढवणार असून शिंदे गटाला 10 ते 12 जागा, तर अजित पवार गटाला 6 ते 8 जागा मिळतील, असे अमित शहा यांनी महायुतीतील नेत्यांना सांगितले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 400 चे टार्गेट घेऊन कामाला लागा, असा सल्लाही अमित शहा यांनी दिल्याची माहिती आहे.



या जागांसाठी अजितदादा आग्रही
अजित पवार हे रायगड, परभणी, बारामती, शिरुर आणि आणखी दोन जागांसाठी आग्रही आहेत तर अजित पवारांना जागा सोडण्यास भाजपाने तयारी दाखवली आहे. काही जागांवर शिंदे-अजितदादांचे उमेदवार कमळ चिन्हावरही निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मंगळवारी रात्री सह्याद्री गेस्ट हाऊसवर देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांना सोबत घेऊनशहा यांनी जागा वाटपाबाबत चर्चा केली. या बैठकीत स र्वकाही अंतिम करण्यात आले. सुरुवातीला शहा यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांसोबत चर्चा केली. ही बैठक जवळपास अर्धा तास चालली, त्यानंतर हे दोन्ही नेते सह्याद्री गेस्ट हाऊसवरून निघाले. या दोघांनंतर शहा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासोबत बैठक घेतली.
महायुतीमध्ये या जागांवर दोन्ही पक्षांकडून दावा
दक्षिण मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, शिरूर, मावळ, गडचिरोली, नाशिक, पालघर, ठाणे, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, परभणी, अमरावती, माढा, सातारा या लोकसभा मतदार संघात दोन्ही पक्षांकडून दावा सांगितल्याचे बोलले जात आहे.





