भुसावळातील वाहतूक कोंडी प्रश्न मिटणार : प्रशासकांकडून सिग्नल यंत्रणेचा ठराव मंजूर
20 वर्षानंतर प्रशासकांकडून ठराव : डीपीडीसीतून निधी मिळाल्यास यंत्रणा कार्यान्वीत होण्याची आशा
Traffic jam problem in Bhusawal will be resolved: Resolution of signal system approved by administrators भुसावळ : भुसावळातील सर्वाधिक डोकेदुखीचा प्रश्न असलेल्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी 2003-2004 च्या सुमारास पालिकेने सिग्नल यंत्रणा कार्यान्वीत केली खरी मात्र सुरूवातीचे दोन महिने वगळता नियमित देखभाल व दुरुस्ती न केली गेल्याने सिग्नल यंत्रणा बंद पडली. मध्यंतरीच्या काळात बंद यंत्रणा सुरू करण्याचे प्रयत्नही झाले मात्र नागरीकांनी सिग्नल यंत्रणेचे साहित्यच चोरून नेल्याने आणखी अडचणी वाढल्या. आता नव्याने सिग्नल यंत्रणा कार्यान्वीत करण्याचा मुद्दा ऐरणीवर आला तो प्रभावशाली उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांच्या निमित्ताने. वाहतूक कोंडी व अपघात रोखण्यासाठी सिग्नल यंत्रणा उत्तम पर्याय असल्याची भूमिका त्यांनी लावून धरताच पालिका प्रशासकांनी ही बाब गांभीर्याने घेत ठराव मंजूर केला. पालिका फंडात निधीची अडचण असल्याने डीपीडीसीतून निधी मिळाल्यास शहरात पुन्हा सिग्नल यंत्रणा कार्यान्वीत होवून वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटलेला दिसणार आहे.
नाहाटा चौफुलीवर दहा वर्षांत शंभरावर अपघात
नाहाटा चौफुली भागात सर्वाधिक अपघात झाले आहेत. गेल्या दहा वर्षांच्या कार्यकाळात शंभराहून अधिक जीवघेणे अपघात झाले तन अनेकांचा यात बळीदेखील गेली. नव्याने झालेल्या प्लाय ओव्हरमुळे अवजड वाहने पुलावरूनच आता धावत असलीतरी जामनेरकडून शहरात येणारी तसेच अन्य दोन्ही बाजूंनी शहरात येणार्या वाहनांचे नियमन होण्यासाठी नाहाटा चौफुली भागात सिग्नल यंत्रणा गरजेची आहे.



एकतर्फी वाहतुकीची गरज
शहरातील सर्वात जास्त कोंडी बसस्थानकाजवळ होते़ अवैध वाहतूकदारांनी मांडलेल्या ठिय्यामुळे वेळप्रसंगी पायी चालणे कठीण होते़ त्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने वरणगाव भागातून येणाजया बसेस बसस्थानकात येतील व परतीच्या प्रवासात नाहाटा महाविद्यालयाकडून सोडल्यास समस्या काही प्रमाणात सुटणार आहे.
टोईंग वाहनाचाही पर्याय
शहरात अनेक ठिकाणी एकेरी वाहतूक करणे गरजेचे आहे़ पोलीस प्रशासनाकडून अनेकदा पालिका प्रशासनासह स्थानिक आगाराला या संदर्भात पत्र देण्यात आले आहे मात्र त्यानंतरही कुठलीही ठोस भूमिका संबंधितानी घेतलेली नाही़ सिग्नल यंत्रणा कार्यान्वित केल्यास निश्चित वाहतूक कोंडी कमी होणार आहे शिवाय पालिका प्रशासनाने टोईंग वाहन घेतल्यास दंडात्मक कारवाईतील महसूल पालिकेला मिळू शकतो़
या जागी होती पूर्वी सिग्नल यंत्रणा
शहरातील बाजारपेठ पोलीस ठाण्याजवळ, गांधी पुतळा तसेच पांडुरंग टॉकीजजवळ व नाहाटा महाविद्यालय चौफुलीवर सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली होती मात्र केवळ दोन महिन्यातच ती बंद करण्यात आली़ त्यानंतर देखभाल व निगा ठेवण्यात न आल्याने वर्षानुवर्षे ती बंद असल्याने आजघडीला पूर्णपणे खराब झाली आहे.
वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटेल : कृष्णात पिंगळे
भुसावळातील वाहतुकीची समस्या लक्षात घेता प्रांताधिकारी प्रशासनाला सिग्नल यंत्रणा सुरू करण्याची विनंती केली होती. शहरात वाहतुकीचे नियमन प्रभावीपणे करता येण्यासाठी सिग्नल यंत्रणा प्रभावी ठरेल, असा आशावाद पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी व्यक्त केला.
निधीची मागणी करणार : मुख्याधिकारी
सिग्नल यंत्रणेची बाब खर्चिक असल्याने इस्टीमेट करून तांत्रिक मान्यता घेण्यात येईल. डीपीडीसीतून निधी मागणीचा प्रस्ताव सादर केला जाईल व निधी मागणीसाठी पाठपुरावा करू, असे मुख्याधिकारी महेश वाघमोडे म्हणाले. डीपीडीसीतून निधी मिळताच सिग्नल यंत्रणा कार्यान्वीत करू, असेही ते म्हणाले.





