अनोळखी व्यक्तीला बँक डिटेल्स दिल्यास होईल फसवणूक !
पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे : कोटेचा विद्यालयात व्याख्यान
Giving bank details to a stranger will result in fraud! भुसावळ : कुठलीही बँक फोनवरून ग्राहकाची वैयक्तिक माहिती, एटीएम पीन वा डिटेल्स मागत नाही त्यामुळे बँकेच्या नावाने कुणी अधिकारी फोन करून वैयक्तिक माहिती मागत असल्यास सावध रहा व माहिती देवू नका तसेच कुठल्याही अनोळखी लिंकवर क्लीक करू नका अन्यथा तुमचे बँक खाते रिकामे होवू शकते, असा इशारा भुसावळ शहराचे पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे यांनी येथे दिला. शहरातील श्रीमती प.क.कोटेचा महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थी विकास विभागातर्फे ‘सायबर क्राईम व महिलांबाबत होणारे क्राईम’ या विषयावर महिला दिनानिमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी निरीक्षक रणदिवे बोलत होते.
18 वर्षानंतर चालवा वाहन
निरीक्षक रणदिवे म्हणाले की, कोणत्याही मोबाईलवर आलेल्या अनोळखी मेसेजला प्रतिसाद देवू नये अन्यथा आपली फसवणूक होवू शकते. अल्पवयीन मुलींना लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले जाते त्यामुळे मुलींनी सतर्कता बाळगावी तसेच पालकांना न विचारता कुठल्याही प्रकार लग्नाबाबत निर्णय घेवू नये, असा सल्ला त्यांनी दिला. वयाचे 18 वर्ष पूर्ण न करणार्या मुलीही आता वाहने चालवू लागल्या आहेत मात्र हा प्रकार नियमबाह्य आहे.



18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर वाहनाचा परवाना काढूनच व नियमान्वये कागदपत्रे जवळ बाळगूनचे वाहन चालवावे, असे आवाहन त्यांनी केले. ऑनलाइन शॉपिंग करताना समोरच्या अनोळखी व्यक्तीने दिलेल्या लिंकवर क्लिक करण्या अगोदर सर्व माहिती जाणून घ्यावी व मगच व्यवहार करावे जेणेकरून आपली आर्थिक फसवणूक होणार नाही, असे त्यांनी सांगितले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.व्ही.एस.पाटील होते. विद्यार्थिनींना सायबर सुरक्षित व्हा व जागरूकतेने ऑनलाईन व्यवहार करा, असा त्यांनी सल्ला दिला. शहरचे कर्मचारी शैलेंद्र बनसोडै, चंद्रशेखर गाडगीळ उपस्थित होते. सूत्रसंचालन विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.माधुरी भुतडा यांनी केले. प्रा.निलेश गुरचळ, प्रा.सचिन पंडित, देवयानी गुरव, हरी पाटील यांनी परिश्रम घेतले.





