हतनूरच्या आवर्तनाने भुसावळकरांना दिलासा : आगामी 40 दिवसांची तहान भागणार
बंधारा ओव्हरफ्लो : पिवळ्या व अशुध्द पाणीपुरवठ्यावर नियंत्रण येणार
Bhusawalkars are relieved with the return of Hatnoor : Thirst will be quenched for the next 40 days
भुसावळ : हतनूर धरणातून भुसावळ शहर, रेल्वे व दीपनगर औष्णिक केंद्राला दुसरे आवर्तन मिळाल्यानंतर धरणाचे पाणी शनिवारी रेल्वे व पालिका बंधार्यात पोहोचताच बंधारा ओव्हरफ्लो झाला. यामुळे आता भुसावळकरांची आगामी 40 दिवसांची तहान बंधार्यातील जलसाठ्यातून भागणार आहे. यासोबत कमी दाबाने पुरवठा, पिवळ्या रंगाचा पुरवठ्याचा प्रश्नही सुटेल.
40 दिवस तहान भागणार
भुसावळ शहराला तापीपात्रातील बंधार्यातून पाणीपुरवठा केला जातो. या बंधार्यात सुमारे 39 ते 42 दिवसांचा साठा करता येतो. गेल्या पंधरवड्यात बंधार्याची जलपातळी घसरली. यानंतर पालिकेने हतनूर प्रशासनाकडे आवर्तनाची मागणी केली होती. यानुसार हतनूर धरणातून 12 दलघमीचे आवर्तन एक हजार डे क्युसेस वेगाने सोडण्यात आले. हे आवर्तन पोहोचल्याने शनिवारी तापीपात्रातील अप्पर व निम्न बंधारा ओव्हरफ्लो झाला. शहरातील जलसाठ्याने तळ गाठल्यामुळे नागरिकांना गेल्या आठवड्यापासून कमी दाबाने पाणीपुरवठ्याचा सामना करावा लागला. काही दिवसांपासून अशुध्द व पिवळ्या रंगाचा पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. आता बंधारा ओव्हरफ्लो झाल्याने पिवळ्या रंगाचा, अशुध्द पाणीपुरवठ्यावरही नियंत्रण येणार आहे. शहरासाठी बंधार्यातील जलसाठा आगामी 40 दिवस पुरेल. यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.



रेल्वेचा बंधाराही ओव्हरफ्लो
भुसावळ शहरासोबत भुसावळ विभागीय मध्य रेल्वे प्रशासनानेही हतनूर धरणाकडे आवर्तनाची मागणी केली होती. यामुळे आता आवर्तनामुळे शहरातील तापी बंधार्यातील रेल्वे बंधार्यातही मुबलक जलसाठा झाला आहे. पाणीटंचाईच्या झळा आगामी काळात भासणार नाहीत मात्र आगामी महिन्यात पुन्हा आवर्तनाची गरज भासणार आहे. यंदा हतनूर धरणात गतवर्षापेक्षा अधिक जलसाठा असल्याने आवर्तन वेळेत उपलब्ध होईल.
पाईप लाईन दुरुस्ती गरजेची
बंधार्यातील जलसाठा वाढल्याने अशुध्द पाण्याचा प्रश्न निकाली निघेल मात्र शहरातील पाईप लाईन गळतीमुळे पावसाळ्यातील अशुध्द पाणी पाईप लाईनमध्ये शिरुन पुन्हा अशुध्द पाण्याचा पुरवठा होण्याची शक्यता आहे. यामुळे पालिका प्रशासनाने उन्हाळ्यातील जलजन्य आजार रोखण्यासाठी पाईप लाईनचे सर्वेक्षण करुन डागडूजी करणेही गरजेचे आहे.





