बोदवड बाजार समितीला कुलूप ठोकण्याचा इशारा अन् सुरू झाले लिलाव
बोदवडमधील पिळवणुकीमुळे शेतकरी संतप्त : आमदारांच्या इशार्याने खळबळ
Bodwad market committee warned to lock and auction started बोदवड : बोदवड शहरात बाजार समिती असूनही शेतकर्यांकडील मालाचा लिलाव होत नसल्याची ओरड होत होती. त्याचा खुद्द अनुभव शिवसेनेचे तालुका संघटक शांताराम कोळी यांना गुरुवारी आला. शेतीचा कृषी माल बाजार समितीत आणल्यानंतरही कुणीही दाद देत नसल्याने त्यांनी ही बाब आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कानावर टाकली. आमदार तडका-फडकी दुपारी बाजार समितीत दाखल झाले व त्यांनी शेतमालाची खरेदी-विक्री सुरू करा अन्यथा बाजार समितीला कुलूप लावतो, असा इशारा देताच यंत्रणा हलली व शेती मालांच्या लिलावाला सुरवात झाली. व्यापार्यांनी दुपारी लिलाव पद्धत्तीने हरबर्याची बोली लावल्याने शेतकर्यांनी समाधान व्यक्त केले.
सुविधा पुरवण्याचा केवळ बनाव !
गेल्या काही महिन्यांपासून बोदवड बाजार समितीत शेती मालाची खरेदी-विक्री सुरू व्हावी यासाठी शिवसेनेचे तालुका संघटक शांताराम कोळी हे सातत्याने पाठपुरावा करीत होते मात्र बाजार समितीत शेतकरी मालाची खरेदी-विक्री सुरू असून शेतकर्यांना सर्व प्रकारच्या सुविधा पुरवल्या जात असल्याचा दावा करण्यात येत होता. गुरुवारी शिवसेना तालुका संघटक शांताराम कोळी यांनी त्यांचा शेती उत्पादित शेतीमाल कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी आणला असता यावेळी कुणीही आडत्या-व्यापारी उपलब्ध नव्हते. शेती माल उठविण्यासाठी हमाल नसल्याने शांताराम कोळी व त्यांचा मुलगा प्रज्वल कोळी यांनी हरबरा माल बाजार समितीच्या ओट्यावर आणला. पाच तास होवूनही दखल घेतली जात नसल्याने आमदारांना हा प्रकार कळवण्यात आला.



सचिवांची खरडपट्टी : कुलूप लावण्याचा इशारा
शांताराम कोळी यांनी आमदार पाटील साहेब यांना बाजार समितीत शेतकर्यांची कशा पद्धत्तीने पिळवणूक सुरू आहे याबाबत माहिती दिल्यानंतर आमदारांनी दाखल होत बाजार समिती सचिवांची खरडपट्टी काढली. सहाय्यक निबंधक व सहाय्यक आयुक्त यांना शेतकर्यांच्या शेतीमालाची (कपाशी, मका, ज्वारी, सोयाबीन हरबरा, कडधान्य) खरेदी-विक्री सुरळीत चालू करण्याच्या सूचना दिल्या. येत्या दोन दिवसात शेतीमालाची खरेदी विक्री सुरू न झाल्यास बाजार समितीला कुलूप ठेवण्याचा इशारा देण्यात आला. पत्रकार परीषद घेऊन शेतकरी यांची फसवणूक करू नका अन्यथा मी स्वतः आंदोलन करेल, असा इशाराही आमदारांनी दिला.
शेतकर्यांनी मांडली तक्रार
चिंचखेडसीम येथील शेतकरी यांनी त्यांचा अनुभव सांगताना इथे लिलाव होत नसल्याने आम्हाला मलकापूर येथील बाजार समितीत माल विक्रीसाठी जावे लागत असल्याची कैफियत मांडली. शेतकरी शांताराम कोळी, विधानसभा प्रमुख सुनील पाटील, नगराध्यक्ष आनंदा पाटील, अ.जिल्हा कार्याध्यक्ष कलीम शेख तालुका प्रसिद्धी प्रमुख अप्पू भांजा, नगरसेवक दिनेश माळी, भास्कर गुरचल, शरीफ मण्यार, राजू भांजा, दीपक कोळी, संदीप कोळी, प्रज्वल कोळी, चिंचखेडसीमचे शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.





