रक्षा खडसेंच्या उमेदवारीला वरणगावात विरोध : 200 पदाधिकार्यांचे सामूहिक राजीनामे
वरणगाव : भाजपने रावेर लोकसभा मतदारसंघातून रक्षा खडसे यांना पुन्हा उमेदवारी दिल्याने सुरू झालेले राजीनाम्याचे सत्र आता भुसावळ तालुक्यातील वरणगाव शहर, परिसरात पोहोचले आहे. वरणगाव येथील पदाधिकारी व कार्यकर्ते बुथप्रमुख व सुपर वॉरीयर्स मिळून 200 जणांनी रविवारी आपल्या पदाचे राजीनामा राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांच्याकडे पाठवले असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी दिल्याने रावेर लोकसभा मतदारसंघात खळबळ उडाली आहे.
रक्षा खडसे यांच्या उमेदवारीला विरोध
बोदवड, मुक्ताईनगर, यावल, रावेर, चोपडा, भुसावळ व इतर तालुक्यांमध्ये रक्षा खडसे यांच्या उमेदवारीला भाजपमधून तीव्र विरोध होत आहे. याचे पडसाद आता भुसावळ तालुक्यातील मोठी नगरपालिका तसेच निवडणुकीत महत्त्वाच्या असलेल्या वरणगाव शहर व परिसरात उमटत आहे. रक्षा खडसे यांना पुन्हा उमेदवारी नकोच अशी भूमिका घेत वरणगाव भागातील भाजपच्या 200 पदाधिकार्यांनी आपल्या पदाचे सामूहिक राजीनामा दिल्याने खळबळ उडाली.



यांनी दिले राजीनामे
सामूहिक राजीनामा देणार्यांमध्ये माजी नगराध्यक्ष तथा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सुनील काळे, माजी उपनगराध्यक्ष शेख अखलाक शेख युसूफ, ओबीसी शहराध्यक्ष गोलू राणे, युवा मोर्चा शहराध्यक्ष आकाश निमकर, शहराध्यक्ष सुनील माळी, तालुका उपाध्यक्ष माला मेढे, शामराव धनगर, महिला शहर अध्यक्ष प्रणिता पाटील, जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद भैसे, अल्पसंख्यांक जिल्हा सरचिटणीस डॉ.सादिक शेख, जिल्हा उपाध्यक्ष हजी फायुम, तालुकाध्यक्ष साबीर कुरेशी, तालुका सरचिटणीस रमेश पालवे, नाना चुधरी, हितेश चौधरी, सुशीलकुमार झोपे, शेतकी संघ संचालक सुशील झोपे विविध कार्यकारी संचालक अनिल वंजारी, गुड्डू बढे, कायदे आघाडी सरचिटणीस अॅड.ए.जी.जंजाळे यांच्यासह 200 जणांचा समावेश असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष तथा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सुनील काळे यांनी दिली.