भुसावळातील वाघचौरे दाम्पत्याला फुले-शाहु-आंबेडकर पुरस्कार
Phule-Shahu-Ambedkar Award to Waghchaure couple from Bhusawal भुसावळ : भुसावळातील आर्या फाउंडेशनचे अध्यक्ष उमेंन्द्र वाघचौरे व संचालिका डॉ.वंदना वाघाचौरे या दाम्पत्याच्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना मुंबई येथील कार्यक्रमात शाहू, फुले, आंबेडकर पुरस्काराने गौरवण्यात आले. सामाजिक न्याय क्षेत्रातील काम करणार्या संस्थांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. मुंबईतील नॅशनल सेंटर ऑफ परफॉर्मिंग आर्ट येथे झालेल्या कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, आमदार भरत गोगावले, आमदार संजय सावकारे, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, समाज कल्याण विभागाचे आयुक्त ओमप्रकाश-बकोरीया यांची उपस्थिती होती.
मुंबईत पुरस्काराचे वितरण
भुसावळातील वाघचौरे दाम्पत्याने जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथे अनेक वर्षे नवजीवन व्यसनमुक्ती केंद्राच्या माध्यमातून जनजागृती करून आजपर्यंत हजारो लोकांना व्यसनांच्या विळख्यातून बाहेर काढले असून ते लोक आता आनंदी आयुष्य जगत आहे. त्याच पद्धतीने अध्ययन पॅरामेडिकल कॉलेजच्या माध्यमातून दिव्यांग आणि निराधार विद्यार्थ्यांना अरुणोदय शिष्यवृत्ती प्रदान करून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिली जात आहे. त्याचप्रमाणे हिरकणी महिला मंचच्या माध्यमातून महिलांच्या कला गुणांना वाव मिळावा म्हणून एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.



अनेक समाजोपयोगी उपक्रम आजपर्यंत आर्या फाउंडशनने राबवले आहेत. हा पुरस्कार समाजकल्याण विभागाचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोड व आमदार संजय सावकारे यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. दाम्पत्याने पुरस्काराचे श्रेय वडील अरुण तायडे, आई लता तायडे, मित्र व संपूर्ण परिवार तसेच आर्या फाउंडेशनच्या संपूर्ण सहकारी टीमला दिले आहे.