भुसावळात आगमनानंतर माजी आमदार संतोष चौधरी म्हणाले ; विजय आपलाच होणार !

माजी आमदार संतोष चौधरी म्हणाले ; विजय आपलाच, ‘नो चिंता’


Reception of former MLA Santosh Chaudhary in the presence of thousands of workers in Bhusawal भुसावळ : रावेर लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून माजी आमदार संतोष चौधरींना तिकीट मिळण्याचे संकेत पक्षश्रेष्ठींकडून मिळताच चौधरी समर्थकांमध्ये आनंदाची लहर पसरली आहे. बुधवार, 20 रोजी दुपारी 12 वाजता माजी आमदार चौधरी यांचे जंक्शन स्थानकावर मुंबई येथून आगमन होताच ढोल-ताशांच्या गजरात कार्यकर्त्यांनी बेभान होवून नृत्य करीत फटाक्यांची आतषबाजी केली. यावेळी चौधरींवर फुलांची उधळण करण्यात आली. माजी नगराध्यक्षा रेखा चौधरी यांनी चौधरी यांचे औक्षण केले. यावेळी कृउबाचे माजी सभापती सचिन चौधरी उपस्थित होते. स्वागतानंतर चौधरींनी रोड शो करीत मतदारांना अभिवादन केले तर ठिकठिकाणी त्यांचे स्वागत करण्यात आले. माध्यमांशी बोलताना चौधरी यांनी विजय आपलाच होणार असल्याचा दावा केला.

स्थानकाबाहेर कार्यकर्त्यांचा जल्लोष
बुधवारी दुपारी 12 वाजता एलटीटी-लखनऊ एक्स्प्रेसने चौधरी यांचे रेल्वे स्थानकावर आगमन होताच कार्यकर्त्यांनी जल्लोष करीत चौधरींच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी ढोल-ताशांचा गजर करीत फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांसमवेत चौधरीही थिरकले. स्थानकाबाहेर माजी नगराध्यक्षा रेखा चौधरी यांनी चौधरींचे औक्षण केले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर ‘रोड शो’ ला सुरूवात झाली.




मतदारांकडून उत्स्फूर्त स्वागत
हजारो कार्यकर्त्यांचा जयघोष, ढोल-ताशांचा गजर करीत चौधरी हे पायी मॉडर्न रोड, सराफ बाजारमार्गे शनी मंदिर वॉर्डातील निवासस्थानी पोहोचले. रस्त्यात जागोजागी मतदारांनी त्यांनी भेट घेत त्यांना आशीर्वाद दिले. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी झाल्याने सर्वत्र वाहतूक कोंडी झाली होती तर पोलिसांची वाहतूक कोंडी फोडताना धावपळ उडाली.

यांची होती उपस्थिती
यावेळी प्रहार उत्तर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिल चौधरी, भुसावळ कृउबाचे माजी सभापती सचिन चौधरी, धीरज चौधरी, प्रहार युवक जिल्हाध्यक्ष युवक दिनेश कोळी, माजी नगरसेवक दुर्गेश ठाकूर, काँग्रेसचे मुन्वर खान, वंचितचे युवक जिल्हाध्यक्ष बाळा पवार, शिवसेना शहरप्रमुख दीपक धांडे, बबलू बर्‍हाटे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष दीपक बर्‍हाटे, उल्हास पगारे, रामदास सावकारे, राहुल बोरसे, यावल माजी नगराध्यक्ष तुकाराम अण्णा, रावेर माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, जि.प.चे माजी सदस्य मलकापूरचे संतोष रायपूरे, बबलू खान यांच्यासह हजारो कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

दहा वर्षात विकास शून्य : विजय आपलाच होणार
रोड शो नंतर शनी मंदिरातील निवासस्थानी माध्यमांशी बोलताना माजी आमदार चौधरी म्हणाले की, पक्षार्चे सर्वेसर्वा शरद पवारांची भेट घेतल्यानंतर त्यांच्याकडून ग्रीन सिग्नल मिळाला असून गुरुवारी अधिकृतरीत्या उमेदवारी जाहीर होणार आहे. शुक्रवारपासून प्रचार दौर्‍याला सुरूवात होईल. गेल्या दहा वर्षात मतदारसंघाचा कुठलाही विकास झालेला नाही त्यामुळे रावेर लोकसभेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकणार असल्याचे माजी आमदार चौधरी म्हणाले. आपल्या उमेदवारीमुळे भुसावळकरांच्या आनंदाला पारावर उरलेला नाही शिवाय
भुसावळच्या इतिहासात प्रथमच लोकसभेची उमेदवारी भुसावळातून जाहीर झाल्याने मतदारांचे आशीर्वाद आपल्याला मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !