रावेर पालिकेची कर वसुलीसाठी धडक मोहिम : 12 नळ कनेक्शन केले कट
Dhadak campaign of Raver Municipality for tax collection : 12 tap connections cut रावेर : रावेर नगरपालिकेकडून विविध करांचा भरणा करण्यासाठी वारंवार आवाहन करूनही काही नागरिकांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने शनिवारी सकाळी थकीत कर वसुलीसाठी 12 नळ संयोजन खंडित करण्यात आले तर काही गाळ्यांना सील लावण्यात आले. या कारवाईने थकबाकीदारांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली.
कारवाईने उडाली खळबळ
जिल्हाधिकार्यांच्या आदेशान्वये रावेर पालिकेने थकीत मालमत्ता कर व पाणीपट्टी वसुलीसाठी मागील आठवड्यापासून कडक पाउले उचलली आहेत. शनिवारी शहरातील थकबाकीदारांचे गाळे सील करण्याची व नळ संयोजन खंडित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. या विशेष वसुली मोहिमेंतर्गत 12 नळ संयोजन खंडित तर यशवंत विद्यालयाजवळील गाळ्याला सील करण्यात आले. या मोहिमेमुळे शनिवारी दुपारी चार वाजेपासून कर भरण्यासाठी नागरिकांची मोठी रांग लागल्याचे पालिकेत दिसले. तीन दिवस सलग सुट्या असतानाही पालिकेने तिन्ही दिवस पूर्ण वेळ कार्यालय सुरू ठेवून कर भरण्याचे आवाहन नागरिकांना दवंडी व सोशल मीडियाद्वारे केले होते. त्यास प्रतिसाद म्हणून शनिवारी नागरिकांची मोठी गर्दी झाली. महापारेषण सारख्या शासकीय कार्यालयाकडे असणार्या मोठ्या थकबाकीसाठी जिल्हाधिकार्यांत स्वतः पाठपुरावा करून संबंधितांना कर भरण्याच्या सूचना दिल्या.

यांचा वसुली मोहिमेत सहभाग
मोहिमेमध्ये मुख्याधिकारी स्वालीहा मालगावे यांच्या मार्गदर्शनाखाली कर निरीक्षक प्रमोद चौधरी, स्वछता निरीक्षक युवराज गोयर, अभियंता माळी, रचना सहाय्यक गोपाळ राठोड यांच्यासह वसुली विभागाचे दीपक सुरवाडे, युसूफ शेख, निलेश डवले, तुषार रायपूरकर, योगेश भोई, गजानन तलेले, वाजिद खान, वैभव नेहते, दिलीप महाजन, प्रकाश शिंदे, अशोक महाजन, साळी आदी कर्मचार्यांचा सहभाग होता.




