भाजपात स्वगृही परतणार का ? नाथाभाऊंनी स्वतःच केला हा मोठा खुलासा ; म्हणाले की…

Will he return to self-isolation in BJP? Nathabhau himself made this big revelation; Said that… भुसावळ : आमदार एकनाथराव खडसे हे पुन्हा भाजपात स्वगृहीत परतत असल्याच्या जोरदार चर्चा दोन दिवसांपासून सुरू आहेत तर सोमवारी सकाळी आमदार खडसे हे दिल्लीत दाखल झाल्यानंतर राजकीय गोटात विविधांगी चर्चांना ऊत आल्याने कार्यकर्तेदेखील संभ्रमात पडले आहेत. आमदार एकनाथराव खडसे यांच्याशी ‘ब्रेकींग महाराष्ट्र’ ने संपर्क साधून भाजपा प्रवेशाचा विषय छेडला असता नाथाभाऊ म्हणाले की, माझा भाजपात जाण्याचा कोणताही विचार नाही. मी वैयक्तिक सुप्रीम कोर्टाच्या कामानिमित्त दिल्लीत आलो आहे. मला भाजपात जावयाचे असल्यास मी आधी पत्रकार परीषद घेवून आपली भूमिका मांडेल, असे त्यांनी सांगून चर्चांना पूर्णविराम दिला. दरम्यान, आमदार खडसे हे स्वगृही परतल्यास लोकसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला मोठा हादरा बसण्याची शक्यता आहे.
आमदार खडसे स्वगृही भाजपात परतणार ?
रावेर लोकसभेसाठी विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्यानंतर जळगावसाठी विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांचे तिकीट कापून स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली मात्र रावेर लोकसभेच्या जागेवरून भाजपातील अंतर्गत वाद-विवाद समोर आले तर पक्षातूनच खासदार खडसे यांना मोठा विरोध समोर आला. त्यानंतर आता आमदार खडसे पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करीत असल्याच्या जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत.

अंतर्गत वादातून भाजपाला दिली होती सोडचिठ्ठी
जळगाव जिल्ह्यातील मंत्री गिरीश महाजन व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेल्या वादामुळे एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर ऑक्टोबर 2020 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. शरद पवार यांनी त्यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली. त्यानंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंडखोरी केली. ते भाजपबरोबर गेले, पण खडसे यांनी शरद पवारांसोबतच राहणे पसंत केले.
तर पक्ष श्रेष्ठींना सांगून प्रवेश करणार
भाजपमध्ये जाण्याचं कुठलंही मेजर कारण नाही आणि माझी इच्छाही नाही. मात्र केव्हाही जाईल त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कळवेल. शरद पवार यांच्या संमतीने जाईल. मी लपून-छपून जाणार नाही. ज्यावेळी जाईन तेव्हा उघडपणे जाईन पण शरद पवार यांच्या सल्ल्याने जाईन, असे मोठे वक्तव्य आमदार एकनाथ खडसे यांनी काही दिवसांपूर्वी भाजपा प्रवेशाच्या चर्चेवर केले होते. भाजपमध्ये मला जायचं असेल तर यांच्या (मंत्री गिरीश महाजन) यांच्या परवानगीची गरज नाही. मी 40-42 वर्ष भाजपमध्ये होतो त्यामुळे यांच्यापेक्षा वरिष्ठांशी माझे चांगले संबंध आहेत आणि आजही आहेत. पक्षाच्या तत्त्वाशी मतभेद असू शकतात मात्र व्यक्ती म्हणून मी काही कोणाशी मारामार्या केलेल्या नाहीत, असेही त्यावेळी आमदार एकनाथ खडसे म्हणाले होते.
दिल्लीवारीमुळे भाजपा प्रवेशाच्या पुन्हा जोरदार चर्चा
रविवारी रात्री राजधानी एक्स्प्रेसने आमदार खडसे हे दिल्लीला रवाना झाल्यानंतर सोमवारी सकाळी दिल्लीत दाखल झाले आहेत. दिल्लीत आमदार खडसे यांचा भाजपा प्रवेशाचा निर्णय होईल, अशी ही चर्चा होती मात्र सायंकाळपर्यंत कुठलाही असा निर्णय झाला नाही.
दरम्यान, विविध चर्चांच्या पार्श्वभूमीवर आमदार खडसे यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी आपण सुप्रीम कोर्टाच्या कामानिमित्त दिल्लीत येथे आलो असून भाजपा प्रवेशाचा कुठलाही विषय नसल्याचे स्पष्ट केले. भाजपात जाण्यापूर्वी आपण पत्रकार परीषद घेवू व भूमिका मांडू, असेही त्यांनी ‘ब्रेकींग महाराष्ट्र’शी बोलताना स्पष्ट केले.
