यावल बसस्थानकात बाल किर्तनकार हभप संचित कोळी यांनी केली कीर्तनाव्दारे मतदान जनजागृती
At Yaval bus station, child kirtan artist Habhap Sanchit Koli conducted voting awareness through kirtan. यावल : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर यावल शहर व तालुक्यातून मतदानाची टक्केवारी वाढावी या उद्देशाने मंगळवारी स्विप अंतर्गत मतदान जनजागृती रॅली व प्रबोधनाचा कार्यक्रम घेण्यात आला. यात शहरातुन विद्यार्थ्यांच्या सहभागाने काढण्यात आलेली रॅली लक्षवेधी ठरली. बसस्थानकात बाल कीर्तनकार हभप संचित कोळी महाराजांनी कीर्तनाव्दारे मतदान जनजागृती केली. प्रशासन, शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम राबवण्यात आला. मनोरंजनातून प्रबोधन करीत मतदारांनी मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य मानावे या करीता स्विप उपक्रमांतर्गत मतदान जनजागृती करण्यात येत आहे.
शहरातील रॅली ठरली लक्षवेधी
यावल शहरांमध्ये लोकसभा निवडणूक मतदान जनजागृती कार्यक्रम स्विप अंतर्गत घेण्यात आला. शहरातून विद्यार्थ्यांच्या सहभागाने मतदान जनजागृती रॅली काढण्यात आली. हातात विविध बोध वाक्यांचे फलक घेवून विद्यार्थ्यांनी मतदारांना मतदानाचे आवाहन करणार्या घोषणा दिल्या व शहरातून काढण्यात आलेली ही रॅली लक्षवेधी ठरली. बसस्थानकात प्रबोधनाचे कार्यक्रम घेण्यात आले. यामध्ये सरस्वती विद्यामंदिर या शाळेचा विद्यार्थी तथा बाल किर्तनकार हभप संचित कोळी महाराज यांनी मतदानाच्या संदर्भात कीर्तनाच्या माध्यमातून जनजागृती केली. याप्रसंगी यावल शहरातील विविध शाळेतील सर्व विद्यार्थी सहभागी होते.

यांची होती उपस्थिती
या कार्यक्रमाला प्रांताधिकारी देवयानी यादव, तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, गटशिक्षणाधिकारी तथा मतदान जनजागृती कार्यक्रम नोडल अधिकारी विश्वनाथ धनके, निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते, निवडणूक नायब तहसीलदार रशीद तडवी, मुख्याध्यापक गजानन कुलकर्णी, मुख्याध्यापक एम.के.पाटील, पर्यवेक्षक विजय नन्नवरे, व्ही.ए.काटकर, केंद्रप्रमुख शेख शाकीर, डॉ.नरेंद्र महाले सह यावल शहरातील विविध शाळेतील शिक्षक, शिक्षीका व विद्यार्थी मोठ्या संख्येत उपस्थित होते. याप्रसंगी कीर्तनाच्या माध्यमातून मतदानासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. डॉ.नरेंद्र महाले सरस्वती विद्यामंदिराचे विद्यार्थी यांनी कीर्तनामध्ये सहभाग घेऊन उत्तम प्रबोधनाचे कार्य केले. सूत्रसंचालन डॉ.नरेंद्र महाले तर आभार मुख्याध्यापक एम.के.पाटील यांनी मानले.




