नाथाभाऊ भाजपात मात्र अ‍ॅड.रोहिणीताई खडसे राष्ट्रवादीत राहणार !

विधानसभा निवडणुकीसाठी आखले डावपेच : सोमवारी मांडणार स्पष्टपणे भूमिका


Nathabhau is in BJP, but Adv. Rohinitai Khadse will remain in NCP! मुक्ताईनगर : राज्यातील हेवीवेट नेते आमदार एकनाथराव खडसे यांनी अखेर घरवापसीचा निर्णय जाहीर केल्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठा भूकंप आला आहे. अनेकांनी या निर्णयाचे स्वागत केले असून अनेकांना नाथाभाऊंच्या भाजपा प्रवेशाने मोठा धक्का बसला आहे. असे असलेतरी नाथाभाऊंसोबत त्यांच्या कन्या अ‍ॅड.रोहिणी खडसे मात्र राष्ट्रवादीत राहून तुतारीचा प्रचार करणार आहेत. आगामी काळात विधानसभा निवडणुका असल्याने मुक्ताईनगरची जागा युतीतील शिंदे गटाकडे आहे त्यामुळे आमदार चंद्रकांत पाटील यांना फाईट देण्यासाठी कदाचित हा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा आहे.

फेसबुक पेजवर जाहीर केली भूमिका
शनिवारी आमदार एकनाथराव खडसे यांनी स्पष्टपणे आपण भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले. लवकरच ते घरवापसी करणार असल्याचे स्पष्ट झाले मात्र अ‍ॅड.रोहिणीताईंनी वेगळीच घोषणा केली आहे.
शनिवारी अ‍ॅड.रोहिणीताई खडसे यांनी आपल्या फेसबुक पेजवरून आपण शरद पवार गटासोबतच राहणार असल्याची घोषणा केली आहे. यासाठी त्यांनी तुतारी फुंकत असल्याचा फोटो देखील पोस्ट केला आहे. यात त्यांनी स्पष्टपणे आपण शरद पवार यांच्या सोबतच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. आपण सोमवारी शरद पवार साहेबांच्या सोबत पत्रकार परिषद घेऊन सर्व काही स्पष्ट करणार असल्याचे सांगितले.


विधानसभा निवडणुकीसाठी रणनीती
अ‍ॅड.रोहिणीताई खडसे या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा आहेत. त्यांनी आपले वडिल आमदार एकनाथराव खडसे यांच्या थेट विरूध्द भूमिका घेत पक्षातच राहण्याचे जाहीर केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. येत्या काही महिन्यात विधानसभा निवडणूक होणार असून विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील हे शिवसेनेच्या तिकिटावर मुक्ताईनगरातून उभे राहिल्यावर आपल्याला भाजपमधून तिकिट मिळणे अवघड असल्याचे त्यांनी जाणून घेतले असावे. यातूनच त्यांनी शरद पवार गटातच राहण्याचा निर्णय घेतला असावा असे मानले जात आहे







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !