भुसावळात 14 एप्रिलपूर्वी रस्ता खोदल्याने भीम आर्मीतर्फे रास्ता रोको
आंदोलनाची दखल घेत रस्त्याचे काम थांबवले : 35 मिनिटे वाहतूक ठप्प
Road blocking by Bhim Army before April 14 in Bhusawal भुसावळ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीची मिरवणूक निघणार्या यावल रोडवरील राष्ट्रपिता गांधी पुतळा ते शहर पोलीस ठाण्याच्या रस्त्याच्या कामाला शनिवारी सकाळी सुरूवात होताच भीम आर्मीतर्फे जिल्हाध्यक्ष गणेश उर्फ भुरा सपकाळे यांच्यासह कार्यकर्त्यांनी या कामास विरोध दर्शवत महात्मा गांधी पुतळ्यासमोर झोपून रस्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे वाहतूक ठप्प झाली. पोलिसांनी पुढाकार घेत सपकाळे यांची समजूत काढून आंदोलन मागे घेतल्यावर वाहतूक पूर्ववत झाली. हा प्रकार शनिवारी सकाळी 11.15 वाजेच्या सुमारास घडला.
ऐन जयंतीच्या तोंडावर रस्ता कामाने संताप
यावल रोडवरील राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळा ते जुने प्रांत कार्यालयापर्यंतचा रस्ता मंजूर करण्यात आला आहे. हा रस्ता मंजूर होऊन दोन महिन्यांचा कालावधी लोटला आहे मात्र, ठेकेदाराकडून आता ऐन डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवरच कामाला सुरूवात करण्यात आली. या मार्गाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मिरवणूका जाताता व असे असतांनाही आणि यापूर्वीच पालिकेला डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीतर्फे रस्ते चांगले करण्याचे पत्र दिले असतांनाही हेतू पुरस्कर रस्त्याचे काम सुरू करण्यात आल्याने आंदोलक संतप्त झाले व भीम आर्मी संघटनेतर्फे शनिवारी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.


कार्यकर्ते झोपले रस्त्यावर
खोदलेल्या रस्त्यावर उभे असलेले भीम आर्मीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी थेट गांधी पुतळ्यासमोर रस्त्यावर झोपून आंदोलन केले. काही वाहनचालक अन्य बाजूने वाहने काढत असल्याने गणेश सपकाळे यांनी तेथे उभ्या असलेल्या ट्रकच्या (जी.जे.03 बी.वाय.7116) क्लिनर बाजूकडील पुढील चाकाच्या पुढे जाऊन झोपत आंदोलन सुरू केले. यावेळी बाजारपेठ पोलीस निरीक्षक गजानन पघडन व त्यांच्या सहकार्यांनी सपकाळे याची समजूत काढत रस्त्याचे काम थांबविले जाईल, असे सांगत त्यांना बाहेर काढले.
35 मिनिटे वाहतूक ठप्प
रस्त्याचे काम थांबवावे यासाठी पदाधिकार्यांनी रस्त्यावर बसून, झोपून व ट्रकच्या चाकाजवळ झोपून आंदोलन केले. यामुळे तब्बल 35 मिनिटे वाहतूक ठप्प झाली होती. काही वाहन चालकांनी विरुद्ध दिशेने वाहने काढून मार्ग काढला. यावेळी शहर पोलीस ठाण्याचे सहा.निरीक्षक निलेश गायकवाड, बाजारपेठ पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांच्यासह शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी यांनी वाहतूक सुरळीत केली.




