आजोबांचा अंत्यविधी आटोपून नातवाने गावात सुरू केला पाणीपुरवठा !
कुटूंबावर आभाळभर दुःख मात्र नागरी सेवेचे कर्तव्य बजावले
After the grandfather’s funeral, the grandson started water supply in the village! साकळी : ग्रामपंचायतीत पाणीपुरवठा कर्मचारी म्हणून कार्यरत असलेल्या आपल्या आजोबांचे शुक्रवार, 5 रोजी अचानक निधन झाल्याने आपल्यावरील आभाळभर दुःख बाजूला सारून गावातील ग्रामस्थांप्रती असलेली जनसेवेची निष्ठा व कर्तव्य बजावण्याची भावना नजरेसमोर ठेवत नातवाने अंत्यविधी आटोपून अवघ्या तासांनीच म्हणजे संध्याकाळीच पाणीपुरवठा करण्यास सुरुवात केली. या मानवतावादी प्रसंगातून सुरवाडे परिवाराची उदात्त जनसेवेची भावना दिसून आली. दुःखातही नातवाच्या हातून नागरीसेवेचे कर्तव्य बजावण्याच्या कृतीचे जनमानात कौतुक होत आहे.
चार दशकापासून ग्रामस्थांशी नाते
गेल्या जवळपास चार दशकापासून साकळी ग्रामपंचायत कार्यालया अंतर्गत सार्वजनिक पाणीपुरवठा कर्मचारी म्हणून कार्यरत असलेले चिंतामण टोपलू सुरवाडे (69) यांचे शुक्रवार, 5 रोजी सकाळी 6.30 वाजेदरम्यान दम्याच्या आजाराने निधन झाले. तत्कालीन सरपंच स्व.मधुकर आप्पा महाजन यांच्या काळात 14 जाने 1983 पासून चिंतामण सुरवाडे यांनी पाणीपुरवठ्याच्या कामास सुरुवात केली. स्व.चिंतामण सुरवाडे यांचा अंगी असलेल्या विनम्रता, आपलेपणा प्रामाणिकपणा, बोलकेपणा तसेच आपल्या कामाशी असलेल्या एकनिष्ठतेमुळे त्यांनी अल्पावधीच गावातील सर्व जाती-धर्माच्या लोकांना आपलेसे केले होते. अगदी सुख-दुःखाच्या काळात त्यांनी नागरिकांची पाण्याची गरज पूर्ण केली त्यामुळेच ते गावात सर्वांचे लोकप्रिय झाले. गावातील जवळपास 50 वाड्या-वस्तीतील भागात नियमित पाणीपुरवठ्याच्या निमित्ताने त्यांचा महिला-भगिनी, आबाल-वृद्ध, पुरुष मंडळी, युवा वर्ग यांच्याशी सततचा संपर्क यायचा त्यामुळे त्यांनी सर्वांशी एक आपुलकीचं नातं तयार केले होते. याची प्रचिती त्यांच्या अंत्ययात्रेच्या गर्दीवरून दिसून आली.

दम्याच्या आजाराने निधन
गावास पाणीपुरवठ्याचं काम हे माझ्यासाठी खूप ‘भाग्याचा’काम आहे व यासाठीच माझा जन्म झाला असेल त्या करीता मी भाग्यवंत आहे, असे नेहमी चिंतामणदादा सांगायचे. गावातील सार्वजनिक पाणीपुरवठ्याबाबत त्यांना सर्व बारीक-सुरीक माहिती होती. हयात असतांना त्यांच्या सोबत मुलगा रवींद्र सुरवाडे व नातू समाधान सुरवाडे यांनीही पाणीपुरवठ्याच्या कामात सुरुवात करत गावास सेवा दिली. घरची परिस्थिती अतिशय प्रतिकूल असताना त्यांनी चेहर्यावर कधीही जाणवू दिले नाही. या जीवन प्रवासात त्यांना त्यांच्या पत्नी श्रीमती बेबाबाई सुरवाडे यांनी सुद्धा खूप मोठी साथ दिली. 4 रोजी चिंतामण सुरवाडे यांचे सकाळी निधन झाले व त्याच दिवशी सांयकाळी 5.30 वाजता त्यांचा मृतदेहावर अतिशय शोकाकुल वातावरणात अंत्यविधी करण्यात आला.
जनसेवेच्या भावनेचे कौतुक
घरावरील आभाळदुःख बाजूला ठेवत नागरिकांच्या प्रति असलेली जनसेवेची निष्ठा व कर्तव्य बजावण्याची भावना नजरेसमोर ठेवत मयत आजोबा चिंतामण सुरवाडे यांचा अंत्यविधी आटोपून अवघ्या तासांनीच म्हणजे संध्याकाळीच पाणीपुरवठा कर्मचारी असलेल्या नातवाने म्हणजे समाधान सुरवाडे याने गावास पाणीपुरवठा करण्यात सुरुवात केली. एकीकडे दुःख व दुसरीकडे कर्तव्य या मानवतावादी प्रसंगातून सुरवाडे परिवाराची उदात्त जनसेवेची भावना दिसून आली.




