विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेमुळे ठरतो महाविद्यालयाचा दर्जा : प्र.कुलगुरु डॉक्टर एस.टी.इंगळे
The quality of the students determines the quality of the college : Prof. Vice-Chancellor Dr. ST. Ingle भुसावळ : विद्यार्थी हा महाविद्यालयाचा केंद्रबिंदू असतो. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेनुसार महाविद्यालयाचा दर्जा ठरतो, असे मत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावचे प्रकुल गुरु डॉ.एस.टी.इंगळे यांनी व्यक्त केले. भुसावळ येथे कला, विज्ञान आणि पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात आयोजित वार्षिक पारितोषिक वितरण समारंभप्रसंगी डॉ.इंगळे बोलत होते. त्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पुस्तकी ज्ञानाबरोबरच महाविद्यालयात राबविल्या जाणार्या एनएसएस, एनसीसी, स्पोर्ट्स, सांस्कृतिक कार्यक्रम इत्यादी महत्त्वाचे असतात, अशी माहिती दिली.
यांची व्यासपीठावर उपस्थिती
अध्यक्षस्थानी ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.मोहन फालक होते. व्यासपीठावर सचिव विष्णू चौधरी, कोषाध्यक्ष संजय नाहाटा, ज्येष्ठ संचालक प्रभाकर पाटील, नीळकंठ भारंबे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.व्ही.पाटील, उपप्राचार्य डॉ.बी.एच.बर्हाटे, डॉ.ए.डी.गोस्वामी, समितीप्रमुख डॉ.एस.टी.धूम, अधिसभा सदस्य प्रा.एकनाथ नेहेते, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.वाय.एम.पाटील, पर्यवेक्षक प्रा.स्वाती पाटील उपस्थित होते.

85 विद्यार्थ्यांचा पालकांसह सन्मान
डॉ.मोहन फालक म्हणाले की, बक्षिसांपेक्षा विद्यार्थ्यांवर कौतुकाची थाप महत्त्वाची असते. कला, वाणिज्य, विज्ञान विद्याशाखेतील तसेच एनएसएस एनसीसी क्रीडा कला सांस्कृतिक इत्यादी विभागांमध्ये विशेष पारितोषिके प्राप्त केलेल्या एकूण 85 विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांसह मान्यवरांच्या हस्ते पारितोषिकेतून गौरविण्यात आले. सूत्रसंचालन डॉ.चंद्रकांत सरोदे तर बक्षीस वितरणाचे वाचन प्रा.डॉ.ममताबेन पाटील व प्रा.डी.एन.पाटील यांनी केले. यशस्वीतेसाठी समिती सदस्यांबरोबरच प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचार्यांनी परिश्रम घेतल्याचे प्रा.प्रशांत पाटील यांनी कळविले आहे.




