आमदार एकनाथराव खडसेंविरोधात अंजली दमानिया आक्रमक : राष्ट्रपतींना पत्र लिहत केली ही मागणी
मुंबई : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथराव खडसे भाजपात स्वगृही परतत आहेत. येत्या पंधरवड्यात त्यांचा प्रवेश निश्चित असताना आता मुंबईतील सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी खडसेंविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. दमानिया यांनी थेट राष्ट्रपतींना पत्र लिहिले आहे. एकनाथ खडसे यांना राज्यपाल करु नये, अशी मागणी त्यांनी सहा पानी पत्रातून केली आहे. त्यात त्यांनी एकनाथ खडसे यांच्या विरोधात प्रलंबित असलेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची माहिती दिली आहे.
राज्यपालपदी नेमणुकीची शिफारस नाकारण्याची मागणी
दरम्यान राष्ट्रपतींना लिहिलेल्या पत्रात अंजली दमानिया यांनी एकनाथ खडसे यांच्याविरुद्ध प्रलंबित असलेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची माहिती दिली आहे. नैतिक पतनाचा आरोप असलेल्या व्यक्तीला राज्यपाल बनवता येत नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले असून प्रलंबित प्रकरणांमुळे खडसेंची एखाद्या राज्याच्या राज्यपालपदी नेमणुकीची शिफारस झाली तर ती नाकारावी, अशी विनंती केली आहे.

भाजपा पक्ष श्रेष्ठींनाही पाठवत मागणीची प्रत
अंजली दमानिया यांनी राष्ट्रपती दौपदी मूर्म यांना एकूण सहा पानांचे पत्र लिहिले आहे. त्या पत्राची प्रत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत भाजप अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनाही पाठवलेली आहे. याबाबत त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली. घटनेच्या कलम 60 नुसार, राष्ट्रपती संविधान आणि कायद्याचे जतन, संरक्षण आणि रक्षण करण्यासाठी त्यांच्या क्षमतेनुसार सर्वोत्तम प्रयत्न करतील. ते स्वतःला सेवेसाठी समर्पित करतील, अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.




