रावेर तालुक्यात सहा लाखांचा ओजा गांजा जप्त
रावेर पोलिसांची कारवाई : दोघांविरोधात गुन्हा : एकाला अटक

Ganja worth six lakh seized in Raver taluka रावेर : रावेर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे रावेर तालुक्यातील सहस्त्रलिंग गावाजवळ फुलवलेल्या गांज्याच्या शेतीवर कारवाईचा बुलडोजर फिरवत तब्बल 91 किलो 400 ग्रॅम वजनाची ओल्या गांजाची झाडे जप्त केली. जप्त गांज्याचे बाजारमूल्य सहा लाख 21 हजार 520 रुपये आहे. याप्रकरणी आरोपी अक्रम कासम तडवी व शाहरुख कासम तडवी (दोन्ही रा. सहस्त्रलींग, ता.रावेर) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. यातील आरोपी शाहरूख तडवी यास अटक करण्यात आली.
गोपनीय माहितीवरून कारवाई
रावेरचे पोलीस निरीक्षक डॉ.विशाल जयस्वाल यांना लालमाती ते सहस्त्रलींग गावाच्या रस्त्यालगत एका शेतात गांज्याच्या झाडाची लागवड करण्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सहाय्यक निरीक्षक आशिष अडसुळ, पोलीस उपनिरीक्षक सचिन नवले, रावेर तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब वाळके, दोन पंच, फोटो ग्राफर, वजन काटा मालक यांच्यासह बुधवारी सायंकाळी उशिरा धाव घेतली. यावेळी अक्रम कासम तडवी व शाहरुख कासम तडवी (दोन्ही रा. सहस्त्रलींग, ता.रावेर) यांनी गांजाची शेती फुलवलेली आढळल्याने रात्री उशिरापर्यंत गांज्याच्या शेतीवर कारवाई करण्यात आली. जप्त ओल्या गांजाचे वजन 91 किलो 400 ग्रॅम असून त्याचे बाजारमूल्य सहा लाख 21 हजार 520 रुपये आहे. याप्रकरणी आरोपींविरोधात जगदीश लिलाधर पाटील यांच्या फिर्यादीवरुन रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, सहाय्यक पोलीस अधीक्षक अन्नपुर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक डॉ.विशाल जयस्वाल, सहा.निरीक्षक आशिष अडसूळ, पोलीस उपनिरीक्षक सचिन नवले, हवालदार ईश्वर चव्हाण, नाईक जगदीश पाटील, नाईक कल्पेश आमोदकर, पोलीस कॉन्स्टेबल मुकेश मेढे, पोलीस कॉन्स्टेबल सचिन रघुनाथ घुगे, पोलीस कॉन्स्टेबल विशाल शिवाजी पाटील, पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद सुभाष पाटील, पोलीस कॉन्स्टेबल महेश मंगलदास मोगरे, पोलीस कॉन्स्टेबल समाधान कौतीक ठाकुर, पोलीस कॉन्स्टेबल संभाजी रघुनाथ विजागरे यांच्या पथकाने केली.


