यावल तालुक्यात अवकाळी पावसाचा शेकडो हेक्टरवरील केळीसह शेती पिकांना फटका

In Yaval taluka, unseasonal rains hit agricultural crops including bananas on hundreds of hectares
यावल : यावल तालुक्यात शुक्रवारी सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसामुळे यावल शहर व तालुक्यातील शेकडो हेक्टरवरील केळी, गहू, मका आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कापणीयोग्य केळी ही जमीनदोस्त झाली आहे. शेतातील मोठ-मोठे वृक्ष कोलमडले आहेत. या अवकाळी पावसाचा यावल तालुक्याच्या पश्चिम भागाला सर्वात जास्त फटका बसल्याचे शनिवारी प्राथमिक पाहणीअंती दिसून आले. महसूल विभागाला चोपडा आमदार लता सोनवणे यांनी तातडीने पाहणी करून पंचनामाच्या सूचना केल्या आहेत.
पश्चिम भागाला सर्वाधिक फटका
तहसीलदारांच्या माध्यमातून तलाठी मंडळ अधिकारी यांच्या वतीने प्रारंभिक पाहणी करून नुकसानीचा प्राथमिक पंचनामा केला जात आहे. यावल तालुक्यात शुक्रवारी सायंकाळी मेघ गर्जनेसह वादळ आले व गारपीट होत वादळी वार्यासह पाऊस दाखल झाला. या पावसामुळे यावल तालुक्यातील पश्चिम भागाला मोठा फटका बसला आहे. यावल शहरालगत तसेच साकळी, दहिगाव, मोहराळा, हरिपुरा, चुंचाळे, बोराळे, थोरगव्हाण, विरोदा, पिळोदा, पथराडे, नायगाव सह अनेक भागांमध्ये शेतातील केळी पीक, गहू, मका सह आदी पीक जमीनदोस्त झाले आहे. या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका यावल तालुक्यातील पश्चिम भागाला बसला आहे.
आमदारांकडून पंचनाम्यांच्या सूचना
चोपडा आमदार लता सोनवणे यांनी तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्याशी संपर्क साधून तातडीने प्राथमिक पंचनामे करण्याच्या सूचना केल्या आहेत. महसूल विभागाच्या वतीने तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी, तलाठी यांच्या वतीने प्राथमिक पंचनामे सुरू झाले आहे. पश्चिम भागात जास्त प्रमाणात नुकसान झाल्याचे प्राथमिक चित्र आहे.
केळी पिकाला मोठा फटका
या वादळी वार्यासह गारपीटसोबत झालेल्या या पावसामुळे यावल तालुक्यातील पश्चिम भागातील केळी पिकाचे मोठे नुकसान झाले. कापणीयोग्य झालेली केळी ही जमीनदोस्त झाली आहे. शेतकर्याच्या हाता-तोंडाशी आलेला घास हा हिरावून गेल्याचे चित्र दिसत आहे.
नुकसान भरपाईची अपेक्षा
यावल तालुक्यातील पश्चिम भागात पावसाचा व वार्याचा वेग अधिक होता त्यात मका, गहू व कापणी योग्य केळीला मोठा फटका बसला. या नुकसानामुळे शेतकरी वर्गावर आर्थिक संकट ओढावले आहे. कर्ज घेवून उभे केलेले पीक जमीनदोस्त झाल्याने शेतकर्यांना नुकसान भरपाई मिळावी, अशी अपेक्षा आहे.


