शिरपूर तालुका पोलिसांची मोठी कारवाई : पाच गावठी कट्टे व 11 जिवंत काडतूसांसह दोघे जाळ्यात
शिरपूर : शिरपूर तालुका पोलिसांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमर्टी भागातून गावठी कट्ट्यांची तस्करी करणार्या दोघा तरुणांना अटक करीत त्यांच्याकडून पाच गावठी कट्टे व तब्बल 11 जिवंत काडतूस जप्त केले आहेत. या कारवाईने शस्त्र तस्करी करणार्यांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. बाबासाहेब रामभाऊ मिसाळ (28, जानेफळ, ता.भोकरदन, ह.मु.संभाजीनगर), परमेश्वर भाऊसाहेब मिसाळ (26, देवळीगव्हाण, ता.जाफ्राबाद, जि.जालना) अशी अटकेतील संशयीतांची नावे आहेत.
गोपनीय माहितीवरून कारवाई
शिरपूर तालुक्याचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना उमर्टी भागातून संशयीत गावठी कट्ट्यांची तस्करी करणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला कारवाईचे निर्देश दिले. शिरपूर रोडवरील खामखेडा पुलाजवळ पथक लपून बसल्यानंतर 11 मे रोजी संशयीत दुचाकी (एम.एच.20 एफ.ई.5363) येताच संशयीतांना थांबण्याचा इशारा केला मात्र पोलिसांना पाहताच संशयीतांनी दुचाकीचा वेग वाढवत पळ काढला मात्र पोलिसांनी पाठलाग केल्यानंतर बाजरीच्या शेताजवळ संशयीतांनी दुचाकी फेकत पळ काढला मात्र कर्मचार्यांनी शेतातून आरोपींच्या मुसक्या आवळल्या. अंग झडतीत त्यांच्याकडील 22 हजार रुपये किंमतीचे 11 काडतूस, दिड लाख रुपये किंमतीचे पाच गावठी कट्टे व एक लाख 30 हजारांची दुचाकी आढळल्याने ते जप्त करण्यात आले. आरोपींविरोधात शिरपूर तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.






यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, पोलीस उपअधीक्षक भागवत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुक्याचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, रफिक मुल्ला, संदीप ठाकरे, भूषण पाटील, संजय भोई, स्वप्नील बांगर, योगेश मोरे, कृष्णा पावरा, चालक अलताफ मिर्झा, चालक मनोज पाटील आदींनी केली.
