बारामतीत ईव्हीएम ठेवलेल्या गोदामात अखेर सीसीटीव्ही सुरू
बारामती : बारामती येथे चुरशीची निवडणूक झाल्यानंतर ज्या गोदामात ईव्हीएम ठेवले आहेत तेथील सीसीटीव्ही बंद असल्याचा आरापे शरद पवार गटाच्या एका पदाधिकार्याने केला होता. पदाधिकारी लक्ष्मीकांत खाबिया यांनी यासंदर्भात तक्रार करताच आता गोडाऊनमधील सीसीसीटीव्ही कॅमेरे पुन्हा सुरू करण्यात आले. काही तांत्रिक कारणास्तव हे कॅमेरे बंद होते असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
षडयंत्र असल्याचा केला आरोप
शरद पवार गटाचे लक्ष्मीकांत खाबिया म्हणाले, जेथे ईव्हीएम ठेवले तेथील सीसीटीव्ही कॅमेरे सोमवारी सकाळी दहा वाजल्यापासून बंद आहेत. यामागे काही षडयंत्र असल्याची शंका आहे. संबंधित विभागाच्या आरओ यांच्यासोबत मी बोलण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी उत्तर दिले नाही. गोडाऊनमध्ये तंत्रज्ञ उपलब्ध नाही तर आमच्या लोकांना तिथे जाऊन गोडाऊन दाखवले जात नाही, असे अनेक आरोप त्यांनी केले आहेत.

ही बाब संशयास्पद : सुप्रिया सुळे
खासदार सुप्रिया सुळे यांनीही ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. ईव्हीएम ठेवलेल्या गोदामातील सीसीटिव्ही सोमवारी सकाळी 45 मिनिटे बंद पडले होते. ही बाब संशयास्पद असून मोठा हलगर्जीपणादेखील आहे. संबंधित अधिकारी आणि प्रशासनाला संपर्क साधला असता समाधानकारक उत्तरे आलेली नाहीत. याखेरीज सदर ठिकाणी टेक्निशियनदेखील उपलब्ध नाही. सीसीटिव्ही का बंद पडला याची कारणे जाहिर करावी. याखेरीज संबंधित घटनेला जबाबदार असणार्यांवर उचित कारवाई करणे गरजेचे आहे, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.




