मुक्ताईनगर तालुक्यात 53.20 टक्के मतदान
53.20 percent polling in Muktainagar taluka मुक्ताईनगर : मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात सोमवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत 53.20 टक्के मतदान झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. सायंकाळी उशिरापर्यंत मतदानाची आकडेमोड सुरू होती. शहरात सकाळ पासून मतदान केंद्रावर मतदारांची वर्दळ होती. जिल्हा परिषद शाळा क्रमांक एकमध्ये मतदारांच्या सकाळपासून रांगा होत्या. सोमवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास अचानक पावसाने हजेरी लावल्यामुळे मतदान केंद्रावरची मतदारांची संख्या तुरळक झाली मात्र 20 मिनिटांच्या पावसाने वातावरणात गारवा आल्याने मतदार मोठ्या संख्येने घराबाहेर पडले. दुपारी एक वाजेपर्यंत मतदान केंद्रावर गर्दी दिसून आली.
ग्रामीण भागात सकाळीच मतदान
ग्रामीण भागात सकाळी सात वाजेपासून मतदारांच्या रांगा दिसून आल्या. अनेकांनी 11 वाजेपर्यंत मतदान आटोपून आपल्या दैनंदिन शेती कामाकडे मोर्चा वळवला. दुपारी अनेक भागातील मतदान केंद्रावर अल्पशा मतदारांची गर्दी होती. सायंकाळच्या प्रहरात पुन्हा मतदार मतदानासाठी बाहेर पडले.

नेत्यांनी बजावला हक्क
कोथळी जि.प.शाळेतील मतदान केंद्रावर उमेदवार खासदार रक्षा खडसे, आमदार एकनाथ खडसे यांनी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास सह कुटुंब मतदान केले तर दुपारी 12 वाजेच्या सुमारास मुक्ताईनगर जि.प.मराठी शाळेतील मतदान केंद्रावर आमदार चंद्रकांत पाटील यांनी सहकुटुंब मतदान केले. सकाळी सात ते दुपारी एक आणि सायंकाळी चार ते पाच दरम्यान मतदानाचा टक्का अधिक होता.




