रावेर लोकसभेत विजयाचा तीन्ही पक्षातील उमेदवारांचा दावा
वाढते मतदान कुणाच्या पथ्थ्यावर ः 4 जून रोजी चित्र स्पष्ट होणार
भुसावळ : रावेर लोकसभेची निवडणूक अत्यंत चुरशीच्या वातावरणात सोमवारी पार पडली. निवडणुकीनंतर आता सत्ताधारी व विरोधकांकडून विजयाचे दावे-प्रतिदावे सुरू झाले आहेत तर अनेक ठिकाणी पैजादेखील लागल्या आहेत. 2014 व 2019 मध्ये सलग विजयी झालेल्या भाजपाच्या खासदार रक्षा खडसे यांचा सामना यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार व कोरी पाटी असलेल्या उद्योजक श्रीराम पाटील यांच्यासोबत झाला. लेवा समाजाचे प्राबल्य असलेल्या रावेर लोकसभा मतदारसंघात यावेळी मराठा व मुस्लीम समाजाचे मतदानही निर्णायक ठरणार आहे. चुरशीच्या निवडणुकीत कोण विजयी होणार हे 4 जूनच्या निकालाअंती स्पष्ट होणार आहे.
वाढीव मतदान कुणाच्या पथ्थ्यावर ?
2019 च्या लोकसभा निवडणुकीत 61.4 टक्के मतदान झाले होते तर यंदा 2024 च्या निवडणुकीत 64.28 मतदान झाल्याने मतदानाचा सव्वा तीन टक्का वाढला तर भुसावळ विधानसभेचा विचार केल्यास गतवेळी 52.39 टक्के मतदान झाल्यानंतर यंदा 57.38 टक्के मतदान झाले व हे पाच टक्के वाढीव मतदान आता कुणाच्या पथ्थ्यावर पडणार हे 4 जून रोजी निकालाअंती स्पष्ट होणार आहे. भाजपा, महाविकास आघाडीव वंचितच्या उमेदवारांसह पदाधिकार्यांनी मात्र विजयाचा दावा केला आहे.

रक्षा खडसे विजयी होणार : आमदार एकनाथराव खडसे
मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदान केले. मतदानाची टक्केवारी यंदा वाढली आहे. प्राथमिक अंदाजानुसार दिड ते दोन लाख मतांनी रक्षाताई खडसे या निश्चित निवडून येतील, असा विश्वास आमदार एकनाथराव खडसे यांनी व्यक्त केला. सर्व मतदार, कार्यकर्ते व हितचिंतकांनी सहकार्याबद्दल त्यांचे आभारी असल्याचेही आमदार खडसे म्हणाले.
भाजपाचा विजय निश्चित : आमदार संजय सावकारे
किमान दोन लाखांच्या मताधिक्याने खासदार रक्षाताई खडसे निवडून येतील. असा विश्वास आमदार संजय सावकारे यांनी व्यक्त केला. ते म्हणाले की, लोकांनी मोदीजींवर विश्वास दाखवला आहे. काँग्रेसने 60 वर्षात जे केले नाही ते गेल्या दहा वर्षात मोदीजींनी ते करून दाखवले आहे व नागरिकांनीदेखील विकासाचा वेग अनुभवला आहे. उमेदवार रक्षाताई असल्या तरी पंतप्रधान म्हणून लोकांना नरेंद्र मोदींना पहायचे असल्याने भाजपाला भरभरून मतदान
करण्यात आले. आपसातील मतभेद विसरून कार्यकर्ते कामाला लागले व
बुथलेव्हलपासून भाजपाने काटेकोर नियोजन केल्याचे आमदार म्हणाले.
रक्षा खडसे तिसर्यांदा होणार खासदार : अमोल जावळे
लोकसभा निवडणुकीत अत्यंत चांगल्या प्रकारे भाजपाला मतदान झाले. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, मंत्री अनिल पाटील, मंत्री गुलाबराव पाटील व महायुतीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. या निवडणुकीत मतदारांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. खासदार रक्षा खडसे लाखोंच्या मताधिक्याने विजयी होतील ही ‘गॅरंटी’ आहे, असे भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांनी सांगितले.
जनतेच्या प्रतिसादामुळे विजयाची अपेक्षा वाढली : श्रीराम पाटील
ही लोकसभा निवडणूक माय-बाप जनतेने डोक्यावर घेतली होती, असे चित्र मला दिसत आहे. सर्वात उत्स्फूर्तपणे नागरिक मतदानासाठी बाहेर पडत होते हाच आपला विजय असल्याची भावना महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी व्यक्त केली. माय-बाप जनतेच्या प्रतिसादामुळे विजयाची अपेक्षा वाढली आहे. सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदारांचे तसेच ज्यांनी-ज्यांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे मदत केली त्यांचेदेखील आभार मानतो, असे श्रीराम पाटील म्हणाले.
वंचितचा उमेदवार निवडून येणार : संजय ब्राह्मणे
रावेर लोकसभेत आम्हाला निश्चित यश मिळेल, असा आम्हाला विश्वास आहे. वंचितची पारंपरिक मते आम्हाला मिळाली असून समाजाने पूर्णपणे ताकद वंचितच्या पाठीमागे लावली आहे. पक्षाचे सर्वेसर्वा बाळासाहेब आंबेडकर यांनी दिलेला उमेदवार निश्चित निवडून येईल, असा विश्वास रावेर लोकसभेतील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संजय ब्राह्मणे यांनी व्यक्त केला.
वंचितला भरभरून मतदान : बाळा पवार
मतदारांनी वंचित आघाडीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. भाजपाला पराभूत करण्यासाठी वंचित आघाडी हा सक्षम पर्याय ठरेल, असा सर्वसामान्य मतदारांना विश्वास असल्याने वंचित आघाडीला भरभरून मतदान केले आहे. वंचित आघाडीच्या उमेदवाराचा या लोकसभा निवडणुकीत निश्चित विजय होईल, असा विश्वास युवा जिल्हाध्यक्ष बाळा पवार यांनी व्यक्त केला. 4 जून रोजी निकालाअंती सर्व चित्र स्पष्ट होणार आहे.
वंचितची यशाकडे घौडदौड : शमिभा पाटील
रावेर लोकसभेत अत्यंत चुरशीची मात्र तिरंगी लढत झाली आहे. या निवडणुकीत भाजपाविरोधात सामान्य जनतेचा रोष दिसून आला तर महाविकास आघाडीचे उमेदवार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचू शकले नाहीत मात्र आम्ही यशाकडे घौडदौड केली असल्याचा दावा वंचित आघाडीच्या जिल्हाध्यक्ष शमिभा पाटील यांनी व्यक्त केला. त्या म्हणाल्या की, आम्ही निश्चित शर्यतीत आहोत, यश मिळेल, असा विश्वास आहे. मतदार व कार्यकर्त्यांचे आम्ही शतशः ऋणी आहोत. कार्यकर्ता आमचा स्वाभिमानाची लढाई म्हणून उभा राहिला, कुठल्याही आमिषाला तो बळी पडला नाही, असेही शमिभा पाटील म्हणाल्या.
रावेर लोकसभेत तूतारी जोरात वाजणार : संतोष चौधरी
रावेर लोकसभेत अत्यंत चुरशीची लढत झाली. कोरी पाटी असलेले महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांचा विजय निश्चित आहे. भाजपाकडून धनशक्तीचा वापर मोठ्या प्रमाणावर करण्यात आला मात्र ही निवडणूक जनशक्ती व धनशक्ती झाल्याने त्यात जनशक्तीचा विजय निश्चित असल्याचा दावा भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांनी व्यक्त केला. श्रीराम पाटील यांच्यासाठी मतदार उत्स्फूर्तपणे बाहेर पडले व आमच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अहोरात्र मेहनत घेतल्याने त्यांचेदेखील आभार असल्याचे ते म्हणाले.




